कोल्हापूर : ‘सेबी’ने आतापर्यंत ‘पर्ल्स’च्या जप्त केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य दीड लाख कोटींपर्यंत आहे. जप्त केल्या जाणाऱ्या मालमत्तेची व्याप्ती तीन लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती अखिल भारतीय पीएसीएल (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.‘पर्ल्स’च्या गुंतवणूकदारांच्या मेळाव्यानिमित्त ते कोल्हापुरात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निमंत्रक उटगी म्हणाले, पर्ल्स या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या देशातील सहा कोटी आणि महाराष्ट्रातील एक कोटी गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम ‘सेबी’ने केलेल्या कारवाईमुळे परत मिळणार आहे. ‘सेबी’ने पर्ल्सच्या दीड लाख कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या असून, त्याची व्याप्ती तीन लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या मालमत्तांचा लिलाव केल्यानंतर मिळणारी रक्कम गुंतवणूकदारांना परत दिली जाणार आहे. ‘पर्ल्स’मध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन युवराज सिंग, हरभजन सिंग, ब्रेट ली या क्रिकेटपटूंनी कंपनीचे सदिच्छा दूत (ब्रँड अँबेसिडर) म्हणून केले होते. त्यांच्या आवाहनाला भुलून लाखो गुंतवणूकदारांनी आपली पुंजी गुंतविली; पण आता ती रक्कम बुडाल्याने या सदिच्छादूतांवर गुन्हा दाखल करावा. मुंबई, दिल्ली येथे सेबीची कार्यालय आहेत; पण, ‘पर्ल्स’चे गुंतवणूकदार हे देशातील विविध ठिकाणी आहेत. ते लक्षात घेता गुुंतवणूकदारांचे अर्ज भरून घेण्यासाठी ‘सेबी’ने पासपोर्ट कॅम्पप्रमाणे राज्यात जिल्हानिहाय तात्पुरते कार्यालय सुरू करावे. या पत्रकार परिषदेस असोसिएशनचे सरचिटणीस राजन क्षीरसागर, शंकर पुजारी सतीशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)सत्ताधाऱ्यांनी मालमत्ता जप्त करावीगुंतवणूकदारांच्या तक्रारींची नोंद घेऊन ओरिसा राज्य शासनाने त्यांच्या राज्यातील ‘पर्ल्स’सह काही अन्य फसव्या कंपनीची मालमत्ता जप्त केली असल्याचे निमंत्रक उटगी यांनी सांगितले. ते म्हणाले, गुंतवणूकदारचे संरक्षण करण्याची भाषा अनेकदा राज्यातील भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांनी केली आहे. त्यांनी आता ‘पर्ल्स’ची मालमत्ता जप्त करावी.
‘पर्ल्स’च्या मालमत्ता जप्तीची व्याप्ती वाढण्याची शक्यता
By admin | Published: September 14, 2016 12:34 AM