कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासातील अडचणी वाढल्या आहेत; कारण पानसरे यांच्या पत्नी उमाताई यांना अजूनही हल्लेखोरांसंदर्भात काहीच ठोस माहिती देता आलेली नाही. पोलिसांनी त्यांना यासंबंधीची विचारणा केल्यावर त्या एकदमच शांत बसत असल्याने हल्लेखोरांसंदर्भात एखादाही सुगावा हाती लागलेला नाही.हा हल्ला झाला तेव्हा १६ फेब्रुवारीस उमा पानसरे श्री. पानसरे यांच्यासोबतच होत्या. त्यावेळी पानसरे यांची प्रकृती बरी नसल्याने उमाताई त्यांच्यासोबत दारातच येरझाऱ्या घालत होत्या. त्याचवेळी उभयतांवर हा हल्ला झाला. त्यामध्ये पानसरे यांचा मृत्यू झाला. उमाताई यांच्याही डोक्याला डाव्या बाजूस गोळी चाटून गेल्याने जखम झाली आहेच; शिवाय मेंदूलाही काही प्रमाणात इजा झाली आहे. त्यामुळे व या घटनेचा मानसिक धक्का मोठा असल्याने त्यांना हल्ल्याचा प्रकार नेमका कसा झाला यासंबंधी काहीच सांगणे अवघड बनले आहे. किंबहुना त्यांच्याकडून दिली जाणारी माहिती विसंगत असल्याचे तपासात पुढे येत आहे.पोलिसांनी हा हल्ला नेमका कसा झाला यासंबंधीचे चित्रण करून ते उमातार्इंना टीव्हीवर दाखविले. जेणेकरून त्यांच्या स्मृती त्यामुळे जाग्या होऊन त्यांना काहीतरी त्यातील आठवू शकेल; परंतु अजूनही त्यांना हल्लेखोर नेमके कुणीकडून आले यासंबंधीची माहितीही खात्रीपूर्वक देता आलेली नाही. अगोदर दिलेल्या माहितीबद्दल पुन्हा विचारणा केल्यावर त्यांच्याकडून अगोदरच्या माहितीच्या विसंगत माहिती दिली जात आहे. उमाताई काल, मंगळवारी रात्री उशिरा डिस्चार्ज देण्यात आला. त्या घरी गेल्यानंतर पानसरे यांच्या आठवणींनी त्यांच्या मनात काहूर उठू शकते. त्यातूनच त्यांना काही आठवण्याची शक्यता मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे; परंतु त्यासाठी किती कालावधी लागेल हे सांगणे अवघड बनले आहे. त्यामुळे हल्ला घडला तेव्हा प्रत्यक्षदर्शी असलेल्या उमाताई यांच्याकडून पोलीस तपासास पूरक माहिती मिळण्यात अडचणी आल्या आहेत. त्याचा परिणाम एकूण तपासावर झाला आहे.
उमा पानसरेंकडून सुगाव्यासाठी अडचणी
By admin | Published: March 05, 2015 12:20 AM