आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२३ : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया पुन्हा रेंगाळली आहे. संलग्न सहकारी संस्थांकडून ठराव मागवून तेरा दिवस उलटले तरी प्रारूप मतदार यादीचा पत्ता नसल्याने सभासदांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय जाणीवपूर्वक निवडणूक लांबविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत असून निवडणूक प्राधिकरणाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. बिद्री साखर कारखान्याचे वाढीव सभासदांचे प्रकरण गेली दोन वर्षे सुरू आहे. या सभासदांची छाननीच्या कामातही प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने विलंब लावल्याचा ठपका सर्वच यंत्रणेने ठेवला आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय मंडळींनी रेटा लावल्यानंतर संलग्न संस्थांकडून प्रतिनिधींच्या नावांचे ठराव मागविले. ठराव दाखल करण्याची मुदत संपून तेरा दिवस झाले. साधारणत: आलेल्या ठरावांची छाननी करून संबंधित संस्थेकडे कच्ची यादी तयार करण्यासाठी दिली जाते. त्यानंतर सहा ते सात दिवसांत प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाते.
‘बिद्री’ची कच्ची यादीसाठी कारखान्याकडे माहितीच अद्याप पाठविलेली नाही. न्यायालयाने चार आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया घेण्याचे आदेश दिले होते. हा कालावधी संपला तरी ‘बिद्री’ची निवडणूक गती घेत नाही. निवडणूक लांबणीवर टाकण्यात नेमका ‘रस’ कोणाचा आहे, याविषयी कार्यक्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकती व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी असतो. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक होऊन प्रत्यक्ष मतदानापर्यंतचा ४५ दिवसांचा कालावधी राहतो. त्यामुळे आता जरी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली तरी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यास अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
‘बिद्री’ची निवडणूक वेळेत घ्यावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीस विलंब झाला आहे. त्यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- आमदार प्रकाश आबिटकर