पीक नोंदणीची प्रक्रिया करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे महसूल विभागामार्फत ई पीक पाहणी करून पीक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असा ठराव आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. तर ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्यावर निराधार व बिनबुडाचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा निषेध करण्यात आला. आजऱ्याचे कोरोना कोव्हिड सेंटर बंद करण्याला सर्व सदस्यांनी विरोध केला. अध्यक्षस्थानी सभापती उदय पवार होते.
गटविकास अधिकारी बी.डी. वाघ यांनी स्वागत केले. यावेळी जि.प. चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेबद्दल नीलिमा पाटील, कविता मगदूम - नाईक व अनुष्का गोवेकर यांचा जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, सभापती उदय पवार व उपसभापती वर्षा बागडी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. शिरीष देसाई यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला. चालू महिन्यात २१५ वीज कनेक्शन जोडली आहेत, अशी माहिती सहायक अभियंता दयानंद कमतगी यांनी दिली. आजरा पाणी पुरवठा योजनेला अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, असे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आजऱ्यात बांबू लागवडीसंदर्भात वन विभागाने घेतलेल्या कार्यक्रमात जि. प.व पं. स. सदस्यांना का बोलाविले नाही. त्याचे नियोजन कोणी केले. तालुक्याला तीनपैकी आणखीन २ आमदार आहेत त्यांनाही निमंत्रण नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रोटोकाॅल का पाळला नाही ? त्याबाबत आम्ही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत असल्याचे सभापती उदय पवार यांनी सांगितले.
गडहिंग्लज ते आंबोली हद्दीपर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता सापडत नाही, असे सदस्यांनी सांगितले; मात्र त्याचे उत्तर देण्यास अधिकारीच नसल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर निरुत्तरीत राहिले. तालुक्यातील सहा अंगणवाड्यांचे मार्चपूर्वी बांधकाम न झाल्यास पैसे परत जातील, असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांनी सांगितले. यावर तातडीने बांधकाम सुरू करण्याबाबत सभापती उदय पवार यांनी सूचना दिल्या.
कोरोनाचे लसीकरण नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही, असे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
यावेळी आजऱ्यातील कोव्हिड सेंटर बंद केले जाणार असल्याबाबत सर्व सदस्यांनी आक्षेप घेतला. कोव्हिड सेंटरचा स्टाफ कमी करा; मात्र सदरचे सेंटर बंद करू नका, याबाबत अधिकाऱ्यांशी योग्य पत्रव्यवहार करा, अशा सूचना देण्यात आल्या.
सभेस रचना होलम, वर्षा कांबळे, शिरीष देसाई यांसह अधिकारी उपस्थित होते.
ठळक मुद्दे :
.. विद्यार्थ्यांना सोमवारपासून एसटी पास मिळणार.
.. मेढेवाडी पाझर तलाव दुरुस्तीसाठी ७६ लाख मंजूर.
.. वाळू उपसा व नदी खोलीकरणाचे काय? सदस्यांचा सवाल.
.. हत्ती संगोपन केंद्राबाबत नागरिकांचे मनपरिवर्तन सुरू.