कोल्हापूर : राज्यातील प्राध्यापकांची २९०० रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. लवकरच ती भरती प्रक्रिया राबविली जाईल तसेच शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटींचा निधी लवकरच वितरित करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत जाहीर केले. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहात शनिवारी मंत्री सामंत यांनी शिवाजी विद्यापीठातील कामकाजासंबंधी आढावा बैठक घेतली.मंत्री सामंत म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील अनेक प्रश्न मंत्रालयात प्रलंबित आहेत, ते प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईतील मंत्रालयातील कामाचा पाठपुरावा करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने कायमस्वरूपी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. त्यामुळे विद्यापीठ व शासनामध्ये समन्वय निर्माण होईल.शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील एक अग्रणी विद्यापीठ असून येथील फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर फॉर सायबर सिक्युरिटी अॅन्ड डाटा सायन्सेसचे राष्ट्रीय संस्थेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने सर्वसमावेशक स्वरूपाचा प्रस्ताव सादर करावा. विद्यापीठामधील विविध प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून पाच वर्षांच्या कालावधीत साधारणत: दहा कोटींच्या निधीची तरतूद करता येईल का, यादृष्टीनेही विचार करावा, अशी सूचनाही दिल्या.यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाविषयी पॉवर पॉर्इंट सादरीकरण केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
बैठकीला आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, कोल्हापूरचे विभागीय सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. पी. एस. पाटील, डॉ.भारती पाटील, डॉ. ए. एम. गुरव आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.