इचलकरंजी : येथील आयजीएम हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस संरक्षण भितींना लागून असलेला जुना भंगार बाजार स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाणे व प्रांत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जागेवर आखणी करून गाळ्यांसाठी नियोजन करण्यात आले आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयजीएम हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणचे अतिक्रमण तत्काळ हटवावेत, असे आदेश प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला दिले होते. या आदेशानुसार नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या व प्रांत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जागेवर ६० गाळ्यांची आखणी करून नियोजन केले आहे. मात्र, त्या ठिकाणी ८० गाळेधारक असून, केवळ ६० गाळ्यांचे नियोजन केल्याने उर्वरित गाळेधारकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ज्या भागात प्रकल्प उभा करण्यात येणार आहे, त्या भागातीलच अतिक्रमण हटवावे, अशी मागणी गाळेधारकांनी केली आहे.