संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : ‘महावीर भगवान की जय’, ‘जैन धर्म की जय’, ‘अहिंसा परमो: धर्म की जय..’ असा जयघोष, रथात फुलांनी सजवलेल्या रथात भगवान महावीरांची मूर्ती, ‘जगा आणि जगू द्या, पर्यावरण वाचवा, वन्यप्राण्यांचे संरक्षण करा, पाणी वाचवा’ असे संदेश देणाऱ्या विविध जिन मंदिरांच्या चित्ररथासह मिरवणुकीने सुरुवात झाली. यात विशेष वेशभूषा, सजीव देखावे, आकर्षक वाद्य, लेझीम पथक, भव्य पंचरंगी ध्वजाद्वारे जैन बांधव उत्साहात सहभागी झाले होते.
भगवान महावीर प्रतिष्ठान आणि समस्त जैन समाजातर्फे महावीर जयंती गुरुवारी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. गंगावेश येथील मानस्तंभ जिन मंदिरात सकाळी भगवान महावीरांचा पंचामृत अभिषेक झाला. त्यानंतर महावीर जन्मकाळ सोहळ्यानंतर प. पू. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भटारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत सागर कमते यांच्या हस्ते पालखी आणि चांदीच्या रथाच्या पूजन झाले. त्यानंतर रथोत्सव मिरवणुकीस पार्श्वनाथ मानस्तंभ दिगंबर जिन मंदिर गंगावेश येथून सुरुवात झाली. भेंडे गल्ली, भाऊसिंगजी रोड, राजाराम रोड, जेल कमान, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, लक्ष्मी रोड, अयोध्या टॉकीजमार्गे दसरा चौकातील दिगंबर जैन मंदिर येथे मिरवणूक विसर्जित झाली.
आमदार राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम, महेश जाधव यांनी रथोत्सवात भाग घेतला. रक्तदान शिबिरात धर्मानुरागी श्रावकांनी रक्तदान केले. चांदीच्या रथात बसण्याचा आणि पांडूकशिलेवर पंचामृत पूजेचा मान सविता आणि अमर भवनेंद्र उपाध्ये परिवारास मिळाला. वात्सल्य भोजन मंडपाचे उद्घाटन अक्षय कमते आणि परिवाराच्या हस्ते झाले. महावीरांची अभिषेक, पूजा आणि आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप झाले.