कोल्हापूर : खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी वृषभ उर्फ मगर विजय साळोखे (वय २१, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) याची कळंबा कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर कारमधून मिरवणूक काढणा-या आठ जणांवर जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील चौघांना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. मिरवणुकीची घटना १९ मार्चला घडली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली.
वृषभ साळोखे याच्यासह अनिकेत किरण शिरदवाडे (रा. वारे वसाहत, कोल्हापूर), अवधूत किरण खटावकर (रा. हनुमाननगर, पाचगाव), धीरज राजेश शर्मा (रा. जगतापनगर, पाचगाव), पृथ्वीराज उर्फ माम्या विलास आवळे (रा. वारे वसाहत), आदित्य कांबळे, विजय साळोखे (दोघे रा. रामानंदनगर) आणि रोहित चौगुले (रा. पाचगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील शिरदवाडे आणि खटावकर यासह चौघांना पोलिसांनी अटक केले. कॉन्स्टेबल सागर विलास डोंगरे यांनी फिर्याद दिली.
पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषभ साळोखे हा खुनाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी असून, त्याच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याची कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती. जामीन मंजूर झाल्याने १९ मार्चला तो बाहेर आला. त्यावेळी साथीदारांनी कारागृहाबाहेर त्याचे स्वागत करून मिरवणूक काढली. घोषणाबाजी आणि मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. मिरवणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करून विरोधी गटावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी संशयितांवर कारवाई केली.
व्हायरल व्हिडिओमुळे अडकलेआरोपी साळोखे याच्या सुटकेनंतर समर्थकांनी तयार केलेला व्हिडिओ काही तरुणांनी सोशल मीडियात व्हायरल केला. किंग इज बॅक, अब तुम्हारी खैर नही, हमारा भाई वापस आया... अशा संदेशांमुळे व्हायरल व्हिडिओ पोलिसांच्या रडारवर आला. यातून संशयितांवर कारवाई झाली.