कोल्हापूर : ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार व मुकादम यांची गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करून येत्या ऊस गळीत हंगामापूर्वी ओळखपत्र द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेतर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तीव्र निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नोंदणीसंदर्भात संबंधित यंत्रणांशी लवकरच चर्चा करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आंदोलकांना दिले.मोर्चासाठी सकाळी अकरापासून जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून ऊसतोड कामगार दसरा चौक येथे जमायला सुरुवात झाली. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब चौगले व सरचिटणीस प्रा. सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. ‘आमच्या मागण्या मान्य करा’, ‘ऊस तोडणी कामगारांचा विजय असो’, ‘प्रतिटन ऊस तोडणी दर ३७८ रुपये द्यावा’ अशा घोषणा देत आंदोलकांनी मोर्चा मार्ग दणाणून सोडला. मोर्चा लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणा देत तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. निवेदनातील मागण्या अशा, येत्या ऊस गळीत हंगामापूर्वी राज्यातील सर्व ऊस तोडणी व वाहतूक मुकादम यांची कल्याणकारी मंडळात नोंदणी करून ओळखपत्र द्यावे, ऊस तोडणी व वाहतुकीमध्ये ४० टक्के परिपत्रकाप्रमाणे ऊस तोड कामगार सुरक्षा योजनेची त्वरित प्रभावीपणे अंमलबजावणी करून प्रॉव्हिडंड फंड, ग्रॅच्युईटी, विमा, मेडिक्लेम योजना, पगारी रजा सुरू करा, सामाजिक सुरक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने पुरेशी भरीव आर्थिक तरतूद करावी.या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कामगारांच्या नोंदणी संदर्भात संबंधित यंत्रणांशी लवकरच चर्चा करू, अशी ग्वाही आंदोलकांना दिली. आंदोलनात आनंदा डाफळे, पांडुरंग मगदूम, अरुण मयेकर, दिनकर अदमापुरे यांच्यासह ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.हलगी घुमक्याच्या कडकडाटाने मोर्चात जोशमोर्चाच्या सुरुवातीला हलगी आणि घुमक्याचा कडकडाट सुरू होता. या आवाजाने मोर्चातील आंदोलकांमध्ये जोश निर्माण केला. हलगी घुमक्याचा कडकडाट आणि मागण्यांच्या जयघोषाने मोर्चामार्ग दुमदुमुन गेला. त्याचबरोबर मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांच्या हातातील ऊस, घोषणांचे फलक व विळ्या हातोड्याचे लाल झेंडे यांनी सर्वांचे लक्ष वेधले.