कोल्हापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या १४ ऑक्सिजन प्रकल्पातून व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या माध्यमातून एका मिनिटाला २१ हजार लिटर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. शिवाय १५६ टन लिक्विड ऑक्सिजनची साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी दिली. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक मानली जात असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजनबाबतीत स्वयंपूर्ण होण्यास सांगितले, त्या अनुषंगाने कार्यवाही करत जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांच्या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषणाने १४ ऑक्सिजन प्रकल्प बसवण्यात आले आहेत. त्यापैकी चार प्रकल्प पूर्ण असून उर्वरित आठ प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासह ४०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सोय करण्यात आली आहे, पर्यायी व्यवस्था म्हणून १५६ टन लिक्विड ऑक्सिजनची साठवणूक क्षमता असणारे टँक, सिलिंडर उपलब्ध आहेत. शिवाय व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडची संख्याही वाढवण्यात येत आहेत.
तिसरी लाट लहान मुलांना बाधित करण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र युनिट, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची व्यवस्था केली जात आहे. त्यांंच्यावर उपचार करण्यासाठी, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कसे लावावे, याबाबत सर्व तालुक्यातील एमबीबीएस डॉक्टरांना सीपीआरमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.
---