लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील डीकेटीई टेक्सटाईल डिप्लोमा विभागातील विद्यार्थ्यांनी इरमुंगळी (जट्रोफा) या उपद्रवी वनस्पतीच्या बियांपासून लिक्वीड व साबण बनवला आहे. हा साबण कोरोना साथीमध्ये पर्यावरणपूरक हॅँडवॉशच्या स्वरुपात वापरता येऊ शकतो. तसेच अॅप्रन, मास्क, बॅँडेज, सॅनिटायझर करण्यासाठीदेखील हे उपयुक्त ठरत आहे.
राहुल कांबळे, निखिल खडके व अमन पेंढारी या विद्यार्थ्यांनी लिक्वीड व साबणाची निर्मिती केली आहे.
कोरोनामुळे आज बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक सॅनिटायझर किंवा साबण यांच्या अतिवापरामुळे त्वचेला खाज सुटणे, पुरळ उटणे, आदी दुष्पपरिणाम दिसून येत आहेत; पण वनस्पतीपासून बनवलेल्या अशा आयुर्वेदिक लिक्वीड सोप व हॅँडवॉशचा वापर मानवाच्या दररोज वापरात आल्याने वरील दुष्पपरिणामांपासून बचाव होत असून, हे संशोधन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुणकारी ठरल्याचे दिसून आले. लिक्वीड हे २ ते ३ थेंब वापरता येते व साबणाचा नेहमीसारखा वापरला जाऊ शकतो.
भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला स्थान असून, याचा संदर्भ घेत विद्यार्थ्यांनी इरमुंगळी या वनस्पतीच्या बियांवर संशोधन केले. इरमुंगळीच्या बिया या काही प्रमाणात विषारी असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्षित केले जाते; पण प्रत्येक वनस्पती ही निसर्गाने दिलेले वरदान आहे, असे ठरवत बियांपासून प्रयोगशाळेमध्ये तेल काढून त्यापासून लिक्वीड व साबण बनवून त्याची सुती कापडावर प्रक्रिया करण्याच्या प्रयोगामध्ये त्यांना यश मिळाले. या विद्यार्थ्यांना प्रा. गौरी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. एस. ए. शेट्टी यांनी कौतुक केले.
फोटो ओळी
१८०७२०२१-आयसीएच-०३ डीकेटीई डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी इरमुंगळी या वनस्पतीपासून लिक्वीड व साबणाची निर्मिती केली आहे. शेजारी मार्गदर्शक शिक्षिका.