कोल्हापूर : महाराष्ट्रातील डाव्या आघाडीचा आधार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, महाराष्ट्रातील अनेक सामाजिक, आर्थिक लढ्यांचे कणखर नेते प्रा. एन. डी. पाटील हे आज काळाच्या पडद्याआड गेले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. प्रा. एन. डी. पाटील यांच्या जाण्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रात शोककळा पसरली.सामान्य शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेल्या नारायण ज्ञानदेव पाटील ऊर्फ एन. डी. पाटील हे तरुणपणीच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सान्निध्यात आले व त्यामुळे त्यांचे जीवनच बदलून गेले. अण्णांनीच स्थापन केलेल्या सातारच्या ‘रयत शिक्षण संस्थे’त ‘कमवा आणि शिका’ योजनेत शिकून त्याच संस्थेत प्राध्यापक, प्राचार्य झालेला हा तरुण पुढे महाराष्ट्राचा सहकारमंत्री झाला. महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या अनेक पिढ्या ‘रयत’मुळे शिकल्या, शहाण्या झाल्या. कर्मवीर अण्णांच्या विचारधारेला बट्टा लागू न देता ही संस्था वाढविण्यात प्रा. पाटील मोठे योगदान होते. प्रा. पाटील यांच्या आयुष्यातील सामाजिक संघर्षाएवढेच हे काम मौल्यवान आहे.प्रा. पाटील यांचे वाचन प्रचंड होते. त्यांचे भाषेवरही प्रभुत्व होते. ग्रामीण जीवनातील म्हणी, वाक्प्रचार, दाखले देत मुद्दा पटवून देण्याची त्यांच्याकडे उत्तम हातोटी होती. अखेरचा श्वास घेईपर्यंत त्यांनी पुस्तकांना अंतर दिले नाही.
Prof. N. D. Patil : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सान्निध्यात आले अन् जीवनच बदलून गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 1:53 PM