कोल्हापूर : बेमुदत काम बंद आंदोलनाच्या अकराव्या दिवशी जिल्ह्यातील प्राध्यापकांनी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. ‘शिक्षण, शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘यूजीसीच्या गुणवत्तापूर्ण शिफारशींची अंमलबजावणी झाली पाहिजे,’ अशा घोषणा देत प्राध्यापकांनी निषेध व्यक्त केला.गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सर्व रिक्त पदे पूर्णवेळ तत्त्वावर भरावीत. प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे प्रलंबित वेतन त्वरित अदा करावे, अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन (एम्फुक्टो)आणि ‘सुटा’च्या नेतृत्वाखाली गेल्या दहा दिवसांपासून प्राध्यापकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे.
या आंदोलनाच्या अकराव्या दिवशी कोल्हापूरमधील प्राध्यापकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सकाळी अकरा वाजता टाऊन हॉल बागेपासून मोर्चाला सुरुवात झाली. ‘उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाºया शिक्षणमंत्र्यांचा धिक्कार असो,’ ‘महाविद्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरली पाहिजेत,’ अशा विविध घोषणा देत मोर्चा पुढे सरकत राहिला. डोक्यावर पांढरी गांधी टोपी घालून आणि हातात मागण्यांचे फलक घेऊन प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाले होते.
महानगरपालिका चौक, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, उद्योग भवनमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलनकर्त्या प्राध्यापकांनी ठिय्या मारला. तेथे त्यांनी विविध मागण्या आणि उच्च शिक्षणमंत्री आणि सरकारविरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.
यावेळी आंदोलनकर्त्या प्राध्यापकांच्या शिष्टमंडळाने आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली. या शिष्टमंडळात ‘एम्फुक्टो’चे उपाध्यक्ष प्रा. सुभाष जाधव, ‘सुटा’चे जिल्हा अध्यक्ष अरुण पाटील, प्रमुख कार्यवाह डी. एन. पाटील, प्रकाश कुंभार, आर. जी. कोरबू, आदींचा समावेश होता. आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे आठशे प्राध्यापक सहभागी झाले.
मागण्या अशा
- सर्व शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील शिफारशी त्वरित लागू कराव्यात.
- जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- विनाअनुदानित महाविद्यालयांतील सर्व शिक्षकांना पूर्ण वेतन द्यावे.
- सर्व शिक्षणसंस्थांनी ‘समान काम, समान वेतन’ तत्त्वाची अंमलबजावणी करावी.
मुंबईत शनिवारी ‘एम्फुक्टो’ची बैठकमुंबई विद्यापीठामध्ये शनिवारी सकाळी अकरा वाजता ‘एम्फुक्टो’ची बैठक होणार आहे. त्यामध्ये राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा आढावा घेतला जाईल. सरकारच्या भूमिकेबाबत चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे प्रा. जाधव यांनी सांगितले.