कोल्हापूर : रिक्त जागांवर प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती व्हावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी आता निर्णायक लढ्याशिवाय पर्याय नाही. या मागण्यांची पूर्तता सरकारने आठवड्याभरात करावी, अन्यथा दि. २५ सप्टेंबरपासून राज्यात प्राध्यापकांचे बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामध्ये शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनचे (एम्फुक्टो) नेते व माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांनी रविवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)तर्फे आयोजित प्राध्यापकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विवेकानंद महाविद्यालयातील डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनात झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ‘सुटा’चे अध्यक्ष डॉ. आर. एच. पाटील होते. मागण्यांच्या पूर्ततेसाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला. प्रा. देशमुख म्हणाले, अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्राध्यापकांवर कामाचा ताण वाढत आहे. सरकारकडून चुकीची शैक्षणिक धोरणे राबविली जात आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात कमालीची अस्वस्थता आहे. डॉ. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांतून बेमुदत काम बंद आंदोलनात सुमारे तीन हजार प्राध्यापक सहभागी होतील. ‘एम्फुक्टो’चे उपाध्यक्ष डॉ. सुभाष जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये ‘एम्फुक्टो’च्या नेतृत्वाखाली आपण आतापर्यंत आंदोलनाचे सहा टप्पे पूर्ण केले आहेत. मात्र, सरकारने काहीच लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता तीव्र आंदोलनाची तयारी करूया, असे आवाहन केले. या मेळाव्यास ‘सुटा’चे मार्गदर्शक प्रा. एस. जी. पाटील, सुधाकर मानकर, एस. ए. बोजगर, इला जोगी, टी. व्ही. स्वामी, एन. के. मुल्ला यांच्यासह शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक उपस्थित होते.‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह डी. एन. पाटील यांनी स्वागत केले. अरुण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आर. के. चव्हाण यांनी आभार मानले.ताकद दाखवावी लागेलप्रलंबित मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी संघटितपणे आपली ताकद सरकारला दाखवावी लागेल. या मागण्यांबाबत सरकारला ‘एम्फुक्टो’समवेत चर्चा करायला वेळ मिळत नाही. आपण योग्य वेळी आपल्या ताकदीची सरकारला जाणीव करू देऊ, असे प्रा. देशमुख यांनी सांगितले.
प्राध्यापकांचा २५ सप्टेंबरपासून काम बंदचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 1:18 AM