कोल्हापूर : रिक्त जागांवर प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती व्हावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो) नेतृत्वाखाली प्राध्यापक मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. त्यामध्ये राज्यभरातील प्राध्यापक सहभागी होणार असल्याने महाविद्यालयांतील कामकाज ठप्प होणार आहे.सन २०१३ मध्ये परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार कालावधीतील रोखलेले वेतन त्वरित अदा करावे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी. जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशा विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एम्फुक्टोने दि. ६ आॅगस्टपासून आंदोलन सुरू केले. या आंदोलनातील सहा टप्पे पूर्ण झाले आहेत.
आता आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी एम्फुक्टोच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून बेमुदत कामबंद केले जाणार आहे. या आंदोलनाच्या कालावधीत राज्यातील प्राध्यापक आपआपल्या जिल्हा, विभागीय पातळीवर निदर्शने करणार आहेत.कॅबिनेट मंत्र्यांच्या जाहीर कार्यक्रमावेळी निदर्शने केली जातील. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारने करार केल्यानंतरच कामबंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
सुमारे २५ हजार प्राध्यापकांचा सहभागउच्च शिक्षण क्षेत्राबाबत राज्य सरकारच्या असलेल्या नकारात्मक धोरणामुळे प्राध्यापकांवर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या आंदोलनात राज्यातील अकरा विद्यापीठांतील सुमारे २५ हजार प्राध्यापक सहभागी होणार आहेत.
तासिका तत्त्वावरील (सीएचबी) सुमारे १५ हजार प्राध्यापक सहभागी होतील, असे ‘एम्फुक्टो’चे उपाध्यक्ष प्रा. सुभाष जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, आंदोलनकर्ते प्राध्यापक विद्यापीठ परीक्षा व्यतिरिक्त इतर सर्व काम बंद करणार आहेत.
या आंदोलनाला प्राचार्य, शिक्षणसंस्था, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, विविध कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील महाविद्यालयांतील कामकाज ठप्प होणार असून सुमारे २० लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार आहे.
आंदोलन झाल्यावरच चर्चा होणार का?शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) शिष्टमंडळाने सातारा येथे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांनी दि. ३० सप्टेंबरपर्यंत बैठक घेण्याची मागणी केली. याचा अर्थ बेमुदत कामबंद आंदोलन झाल्यानंतरच चर्चा होणार का?, असा प्रश्न प्राध्यापकांतून उपस्थित होत असल्याचे प्रा. जाधव यांनी सांगितले.