कोल्हापूर : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटातून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी, अशी मागणी राजस्थानी हिंदू समाज आणि आंतरराष्ट्रीय मानव अधिकार न्यायिक महासंघातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून करण्यात आली. या मोर्चात मोठ्या संख्येने राजस्थानी बांधव सहभागी झाले होते.
सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी चौकातून शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करून मोर्चाला सुरुवात झाली. हातात भगवे ध्वज व भगवे फेटे परिधान केलेल्या आंदोलकांचा हा मोर्चा निषेधाच्या घोषणा देत शहराच्या प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाला. या ठिकाणी निदर्शने करत घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला.
त्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले. देशाला महान असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे.
संस्कृतीचे विकृतीकरण करून संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’ हा चित्रपट इतिहासाची मोडतोड करून अतिरंजितप्रकारे बनविला आहे. त्यामुळे खरा इतिहास बाजूला राहून चुकीचा इतिहास लोकांसमोर आणला जात आहे. या चुकीच्या पद्धतीने बनविलेल्या चित्रपटामुळे सामाजिक तेढ निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारने जनप्रक्षोभ लक्षात घेऊन चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
मोर्चा नगरसेवक ईश्वर परमार, ललित गांधी, रामसिंहजी देवडा, गुलाबसिंहजी देवडा, राजेश राठोड, जबरसिंह परमार, रमेश पुरोहित, लालारामजी देवासी, स्वरूपसिंह सोळंकी, हिरालाल लोहार, जावेद इचलकरंजीकर, रमेश माळवदे, प्रल्हाद तानुगडे, अरुण कांबळे, संतोष पुरोहित, दीपक येजरे, हमीद पन्हाळकर, पांडुरंग जाधव, शंकर भोसले, रघुनाथ फुटाणे, मनोज पवार, हरिष शिंदे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.