कोल्हापूर : पुनर्वसनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या चांदोली, वारणा, उचंगी, सर्फनाला, धामणी प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन मंगळवारी आठव्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनस्थळीच प्रकल्पग्रस्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले.दरम्यान बुधवारी ११ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पग्रस्तांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.आंदोलनस्थळी सकाळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी शिवजयंती साजरी केली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपत देसाई, जिल्हाध्यक्ष मारुती पाटील,रंजना बोडके, सोनाबाई पाटील यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले.
यावेळी ‘जय भवानी...जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज कीय जय..’ अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दुमदुमून सोडला.जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी डी. के. बोडके, आनंदा खामकर, जगन्नाथ कुडतुरकर आदींसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.दरम्यान; प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.