लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : डा. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव परिषदेनिमित्त उभारण्यात आलेला प्रकल्प गेले दीड वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनाचे संकट आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची न मिळालेली तारीख यामुळे हा सव्वा दोन कोटी रुपयांचा प्रकल्प जैसे थे आहे. या ठिकाणी अतिशय प्रभावी असा होलिओग्राफिक शो देखील तयार करण्यात आलेला आहे. मात्र उद्घाटन न झाल्यामुळे तो देखील दाखवला जात नाही. आज २२ मार्च रोजी या परिषदेला १०१ वे वर्ष सुरू होत आहे.
२० मार्च १९२० रोजी डॅा. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या उपस्थितीत माणगाव येथे परिषद झालेली होती. याच परिषदेमध्ये शाहू महाराज यांनी, ‘तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात याबद्दल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, आंबेडकर तुमचा उध्दार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील.’ असे भविष्य वर्तवले होते. यांनतरच्या काळात शाहू महाराजांचे हे उद्गार वास्तवात आले.
या परिषदेला आज १०० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून याआधीच या ठिकाणी सव्वादोन कोटी रुपयांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला. यामध्ये ज्या ठिकाणी ही परिषद झाली त्या ठिकाणी जुन्या पध्दतीचीच इमारत उभारण्यात आली. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर छोटे सभागृह बांधण्यात आले. त्याच्याच थोडे पुढे आंबेडकर लंडन मध्ये ज्या घरामध्ये रहात होत त्याची अतिशय देखणी प्रतिकृती उभारण्यात आली.
या शेजारीच असलेल्या सभागृहामध्ये होलिओग्राफिक शो ची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ४० जणांची बैठक व्यवस्था असून येथे या माणगाव परिषदेशी संबंधित काही चित्रे काढण्यात आली आहेत. हा शो सुरू झाला की आपण माणगाव परिषदेमध्ये बसलो आहोत आणि शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला उद्देश्यून बोलत आहेत असा भास होतो. पुण्याच्या कंपनीने हे काम पूर्ण केले आहे. परंतु उद्घाटन नसल्यामुळे हा शो दाखवला जात नाही.
गतवर्षी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द झाला. त्यानंतर आता शताब्दी वर्ष संपून १०१ वे वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे सव्वा दोन कोटी रुपयांचा हा प्रकल्प केवळ मुख्यमंत्री येऊ शकत नसल्याने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. समारंभ होईल तेव्हा होईल परंतु या वास्तूचा वापर आणि शो दाखवण्याची प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे.
चौकट
माहिती देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर
सध्या या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांकडे या इमारतीच्या किल्ल्या आहेत. कुणीही या ठिकाणी आले की हेच कार्यकर्ते संबंधित माहिती देतात. लंडन हाऊस उघडून दाखवतात. ग्रामपंचायतीच्या ताब्यात अजूनही हा प्रकल्प दिला नसल्याने तिथेही अडचण होत आहे. स्वच्छतेवर मर्यादा येत आहे. याचा विचार लोकप्रतिनिधी आणि शासनाने करण्याची गरज आहे.
चौकट
होलिओग्राफिक शो नसल्याने नाराजी
या ठिकाणी प्रभावी होलिओग्राफिक शो उभारण्यात आला आहे. तो किती चांगला आहे याची माहितीही देण्यात येते. परंतु उद्घाटनाअभावी तो दाखवला जात नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येणारे नागरिक हिरमुसले होतात. माणगाव हे स्मार्ट ग्राम स्पर्धेत गतवर्षी जिल्ह्यात पहिले आहे. त्यामुळे गाव बघायला आलेले नागरिक या ठिकाणी डा. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. परंतु त्यांना हा शो बघता येत नाही. मराठवाड्यातील काही आमदारदेखील या ठिकाणी आले होते. मात्र त्यांनाही तो दाखवता आला नाही. त्यामुळे स्थानिकांची पंचाईत होत आहे.
२००३२०२१ कोल माणगाव ०१
माणगाव येथील या होलिओग्राफिक शो साठी अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
२००३२०२१ कोल माणगाव ०२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील निवासस्थानाची प्रतिकृती माणगाव येथे उभारण्यात आली आहे.
छाया : समीर देशपांडे