कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या प्रचाराची रणधुमाळी आज, रविवारी थंडावणार आहे. रात्री बारापर्यंत उघड प्रचार करण्यास मुभा असल्याने दिवसभर धडाका राहणार आहे. मतदानासाठी अवघे दोन दिवस राहिल्याने उमेदवारांमधील ईर्ष्या टोकाला पोहोचली असून, सर्वच मतदारसंघांत साम, दाम, दंडाचा सर्रास वापर सुरू झाला आहे. गेले पंधरा दिवस ग्रामीण भागांत प्रचाराचा धुरळा उडाला आहे. या वेळेला बहुतांश मतदारसंघांत बहुरंगी लढती होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एखादी बंडखोरीही महागात पडू शकते; त्यामुळे पहिल्या दोन क्रमांकांच्या उमेदवारांनी कमालीची सावधानता बाळगली आहे. मतदानासाठी दोनच दिवस राहिल्याने मतदारांना आकर्षित करण्याचे सर्व मार्ग अवलंबले जात आहेत. जेवणावळींबरोबर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल पाहावयास मिळत आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने उमेदवारांना मतांचा अंदाज आला आहे. कोणत्या गावात आपण कमी पडणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. त्यानुसार मतांच्या जोडणीसाठी वाटेल ती ‘किंमत’ मोजण्याची उमेदवारांची तयारीही दिसत आहे. गटांची फोडाफोडी सुरू आहेच; पण त्याबरोबर पै-पाहुण्यांच्या माध्यमातून घराघरांतील मतदान आपणाला करण्याची रणनीतीही आखली जात आहे. आज, रविवार असल्याने रात्री बारापर्यंत प्रचारात घालविण्याचे उमेदवारांचे प्रयत्न आहेत. उन्हाचा तडाखा सुरू झाल्याने सकाळी सात ते दुपारी दीड व सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत गाठीभेटी सुरू आहेत. सुटीचा फायदा घेत बाहेरगावी असलेल्या मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे नियोजनही केले जात आहे. मंगळवारी मतदारांना ने-आण करण्यासाठी गाड्यांची व्यवस्था करताना अडचणी येत आहेत. बुकिंग करण्यास सगळ्यांनीच सुरुवात केल्याने एवढ्या गाड्या आणायच्या कोठून? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गाव सांभाळा!मंडळातील तरुण कार्यकर्त्यांना सांभाळताना उमेदवारांसह कार्यकर्त्यांची दमछाक उडत आहे. त्यांच्या मागण्या जास्त असल्या तरी थोडीशी पूर्तता करून त्यांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांना आपापली गावे सांभाळण्याचा सल्ला नेत्यांनी दिला आहे. नेत्यांकडूनही तंबीमतदानाचा दिवस आला तरी गटा-तटांतील रुसवा-फुगवा जात नसल्याने थेट नेत्यांनाच पाचारण केले जात आहे. मनधरणी करूनही रुसवा निघाला नाही तर थेट तंबी देऊन मतपरिवर्तन करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहेत.दादांची आज वडणगेत सभापालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज, रविवारी सायंकाळी पाच वाजता वडणगे (ता. करवीर) येथे सभा आयोजित केली आहे. ‘करवीर’मध्ये मंत्री पाटील यांची पहिलीच सभा होत आहे.
कोल्हापुरातील प्रचारतोफा आज थंडावणार
By admin | Published: February 19, 2017 12:55 AM