लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण डावलून एकतर्फी खुल्या पदोन्नती घेण्याबाबतचा शासन निर्णय अन्यायकारक आहे. त्यामुळे बिंदू नामावलीनुसार पदोन्नती द्यावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली.
राज्य शासनाच्या ७ मे २०२१ च्या आदेशाने मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण डावलून एकतर्फी खुल्या पदोन्नत्या घेण्याबाबतचे धोरण आहे. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे, तरी राज्य शासनाने बिंदू नामावलीप्रमाणे पदोन्नत्या घेण्याचा शासन आदेश नव्याने तत्काळ काढण्यात यावा; अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र अंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेच्या वतीने राज्य शासनाला दिला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी संघटनेचे महासचिव नामदेवराव कांबळे, बाळासाहेब कागलकर, गौतम वर्धन, सुधाकर कांबळे, संजय कुर्डूकर, तुकाराम संघवी, पी. डी. सरदेसाई, प्रताप तराळ, बाबासोा कामत, नंदू चौगले, रवींद्र घस्ते आदी उपस्थित होते.