कोल्हापूर : कबनूर (ता. हातकणंगले) येथील पाणीपुरवठा पाइपलाइनचा कार्यारंभ आदेश काढण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी गणपत धनाजी आदलिंग (वय ५७, रा. मराठा कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई सोमवारी (दि. २२) दुपारी चारच्या सुमारास जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागात झाली. आदलिंग याच्या विरोधात ठेकेदाराने तक्रार केली होती.आदलिंगची ग्रामविस्तार अधिकारीपदी पदोन्नती होणार होती. यासाठीच त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत बोलावले होते. तत्पूर्वीच तो लाचेच्या सापळ्यात अडकला. वर्षभरानंतर तो निवृत्त होणार आहे. त्याच्या कार्यशैलीबद्दल कबनूर येथे उलटसुलट चर्चा आहेत.तक्रारदार हे ठेकेदार आहेत. निविदेनुसार त्यांना कबनूर येथील वाढीव पाइपलाइनचे काम मिळाले होते. २ लाख ४० हजार रुपयांच्या कामांचा आदेश काढावा, यासाठी ते ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग याला भेटले. त्यावेळी आदलिंग याने आदेश काढण्यासाठी ९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेत लाचेची रक्कम घेऊन बोलावले.दरम्यान, याबाबत ठेकेदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यांनी तक्रारीची पडताळणी करून सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेत सापळा रचला. या सापळ्यात आदलिंग हा ९ हजार रुपयांची लाच घेताना अडकला. पोलिसांनी त्याला अटक करून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत त्याच्या कसबा बावडा येथील घराची झडती सुरू होती.
पदोन्नतीसाठी आला, लाच घेताना अडकला; कोल्हापुरात ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 12:12 PM