कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये तीन पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला समजली होती. शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून ४५ हजाराची रोकड, मोबाईल हॅडसेट, जुगाराचे साहित्य असा १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
संशयित कुणाल रणजित परमार (रा. कासार गल्ली, गुजरी), अमित विरचंद ओसवाल (रा. शिवाजी पेठ), अंकुश प्रतापचंद शहा (रा.भेंडे गल्ली, कोल्हापूर), प्रेम सुनिल नांगरे (रा. शिवाजी चौक), अनुप श्रीपाल देवकुळे (रा.माळी कॉलनी), ओंकार शिवाजी कवाळे (रा. बागल चौक) अशी अटक केलेल्या सात जणांची नावे आहेत. तसेच हॉटेलचे मालक राहुल शेषमल कर्णावट, व्यवस्थापक विक्रम सदाशिव कदम (रा. दोघे मुक्तसैनिक वसाहत) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसांकडून समजलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना खबऱ्याने फोनवरून माहिती दिली होती. त्यानुसार शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने हॉटेल इंटरनॅशनलवर छापा टाकला. यावेळी पैसे लावून तीन पानी जुगार खेळणाऱ्या सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड जप्त केली.