जहाँगीर शेख -- कागल --शिवसेनेच्या दोन अधिकृत उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ‘घरोबा’ केल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचार यंत्रणेत घड्याळाबरोबरच धनुष्यबाणही दिसत आहे, तर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला एकही जागा येथे सोडली नसली तरी ‘महाआघाडी’ कायम असल्याने तेथेही शिवसेनेचा ध्वज दिसत आहे. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व भाजपमध्ये शिवसेना विभागली असतानाच सेनेच्या प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवार विद्या गिरी या राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवाराविरुद्ध एकाकी प्रचार मोहीम राबवीत आहेत. निवडणुकीतील शिवसेनेची त्रिकोणी विभागणी चर्चेचा विषय बनली आहेज्यावेळी कागल तालुक्यात काँग्रेस पक्षाशिवाय इतरांचे अस्तित्व शून्य होते, तेव्हा शिवसेनेत काम करणे म्हणजे राजकीयदृष्ट्या बहिष्कृत होणे, असा प्रकार होता. तरीसुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेनेचा विशिष्ट युवावर्ग नेहमी कार्यरत राहिला. शिवसेना सत्तेत पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे राजकीय नेते या तंबूत घुसले; पण यामुळे मूळ शिवसैनिकांकडे प्रत्येक वेळी दुर्लक्ष झाले. मात्र, सेनाप्रमुखांचा आदेश अंतिम मानणाऱ्या शिवसैनिकांनी हे नवे नेतृत्वही आपले मानले. आज मुरगूडमध्ये शिवसेना निर्णायक बनली आहे. कागलमध्ये मंडलिक-संजय घाटगे गट म्हणजेच शिवसेना अशी परिस्थिती आहे. मंडलिक गटाचे प्रमुख कार्यकर्ते चंद्रकांत गवळी शिवसेनेचे दोन उमेदवार घेऊन राष्ट्रवादीशी आघाडी करून निवडणूक लढवीत आहेत. मंडलिक-संजय घाटगे गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कार्यरत असल्याच्या आधीपासून शिवसैनिक म्हणून कार्यरत असणाऱ्या विद्या गिरी यांचा प्रचार कोणी करायचा, असा प्रश्न आहे. कारण त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप आणि राष्ट्रवादीचा आहे आणि सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी महाआघाडीसोबत असल्याचे जाहीर केले आहे. तूर्त तरी त्या एकट्याच प्रचारासाठी फिरत आहेत. शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनाही कागलच्या या राजकीय तिढ्यामुळे येथे प्रचारास येण्यास अडचण झाली आहे.
कागलला घड्याळाबरोबर बाणाचाही प्रचार
By admin | Published: November 18, 2016 11:01 PM