कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचा आज (गुरूवारी) शिरोळमध्ये प्रचार राहणार आहे. आघाडीच्या उमेदवारांनी मंगळवारी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन करून प्रचाराचा प्रारंभ केला आहे.
गुरुवारी शिरोळ तालुक्यातील ठरावधारकांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत. तिथे उमेदवार दिला नसल्याने प्रत्येक ठरावधारकापर्यंत पोहोचण्याचे आघाडीचे नियोजन आहे. छोट्या-छोट्या बैठका घेऊन ठरावधारकांशी संपर्क साधला जाणार आहे. त्यानंतर दुपारी हातकणंगले तालुक्यात प्रचार केला जाणार आहे. तेथेही ठरावधारकांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत.
आज चिन्हांचे वाटप
दोन्ही आघाड्यांनी मागणी केल्याप्रमाणे चिन्हे निश्चित करण्यात आली आहेत. गुरूवारी सकाळी अकरा वाजता अधिकृतपणे चिन्हांचे वाटप केले जाईल. यामध्ये सत्तारूढ गटाला ‘पतंग’ तर विरोधी आघाडीला ‘कपबशी’ चिन्ह दिले आहे. अपक्ष तिघांना इतर चिन्हे दिली जाणार आहेत.