कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या अर्जांच्या छाननीनंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडधडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभांचे आयोजन सर्वच राजकीय पक्षांनी केले आहे. २ आॅक्टोबरला उद्धव ठाकरे यांची, तर ४ आॅक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन केले आहे. कॉँग्रेसकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे ही मंडळी प्रचाराची सूत्रे हातात घेणार आहेत. कोल्हापुरात पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, माणिकराव ठाकरे यांची एक-एक सभा घेण्याचे नियोजन आहे, तर नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम यांची प्रत्येक मतदारसंघात एक सभा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, सुप्रिया सुळे यांच्या सभांचे नियोजन आहे. शरद पवार यांच्या दोन ते तीन सभा कोल्हापुरात होणार आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, दिवाकर रावते, नीलम गोरे, आदित्य ठाकरे यांच्या सभा होतील. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आदींच्या सभा होणार आहेत. ४ आॅक्टोबरला पंतप्रधान मोदी यांची सभा कोल्हापुरात होणार आहे.
प्रचाराच्या तोफा धडाडणार
By admin | Published: September 30, 2014 12:43 AM