कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे गेले पंधरा दिवस ग्रामीण भागात उडालेला प्रचाराचा धुरळा रविवारी सायंकाळी शांत झाला. उघड प्रचार संपला असला तरी उमेदवार व नेत्यांच्या जोडण्या गतिमान झाल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात फोडाफोडीला वेग आला असून जेवणावळीसह आर्थिक उलाढालींना अक्षरश: ऊत आला आहे. गुप्त प्रचाराने रात्री जाग्या राहणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक यावेळेला बहुरंगी पाहावयास मिळाली. त्यामुळे सर्वच मतदारसंघांत कमालीची चुरस व ईर्षा दिसत आहे. माघारीनंतर गेले आठ दिवस प्रचाराने चांगलाच वेग घेतला. जाहीर सभा, पदयात्रांबरोबर व्यक्तिगत गाठीभेटीने ग्रामीण भागाला जत्रेचे स्वरूप आले होते. मतदानाचा दिवस जसा जवळ येईल, तसे प्रचारात अधिक आक्रमकता येत गेली. गेली पंधरा दिवस सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रविवारी रात्री शांत झाल्या. उघड प्रचार संपला आणि गुप्त जोडण्या वेगवान झाल्या आहेत. कमी पडणाऱ्या मतांची गोळाबेरीज सुरू झाली. ऐनवेळी कोणता गट फोडला तर तो निर्णायक ठरू शकतो. त्याची चाचपणीही सुरू झाली आहे. रात्री जाग्या राहिल्या असून राजकीय खलबतांना वेग आला आहे. आठ दिवस जेवणावळी जोरात आहेतच, पण काही ठिकाणी भेटवस्तूंचे वाटपही केले जात आहे. हॉटेल्स, धाबे हाऊसफुल्ल झाल्याने गुऱ्हाळघरे, फॉर्म हाऊसवर जेवणावळी सुरू झाल्या आहेत. आर्थिक उलाढालींनाही गती आली आहे. पक्षाकडून मिळालेल्या निधीबरोबर उमेदवारांचे खिसे रिकामे होण्याची वेळ आली तरी निवडणुकीतील ईर्षा थांबण्याचे नाव घेत नाही. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्याने सर्वच पक्षांनी विशेषत: नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणूक वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. आज, सोमवार एकच दिवस राहिल्याने अंतर्गत घडामोडी मोठ्या प्रमाणात होणार आहेत. व्यक्तिगत गाठीभेटी व छुपा प्रचार गतिमान होणार असून शेवटचा प्रयत्न म्हणून उमेदवार व समर्थक मताधिक्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. (प्रतिनिधी)उद्या मतदानजिल्हा परिषदेच्या ६७ गटांसाठी व पंचायत समितीच्या १३४ गणांसाठी उद्या, मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत असून यासाठी विविध पक्ष, आघाड्या व अपक्ष असे ९०५ उमेदवार रिंगणात आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणुकीची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आज, सोमवारी सकाळी यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन साहित्यासह दुपारी मतदान केंद्रांवर पाठविले जाणार आहे. गुरुवारी (दि. २३)सर्व तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. ‘वस्त्रहरण’ थांबले!मुंबई : मुंबईसह १० महापालिका, ११ जिल्हा परिषदा आणि ११८ पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचाराच्या नावाखाली राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये सुरू असलेला ‘वस्त्रहरणा’चा खेळ अखेर रविवारी थांबला. आदर्श आचारसंहितेनुसार जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्याने एकमेकांवर यथेच्छ टीका करणारे पुढारी आता अखेरच्या टप्प्यातील ‘जुळवाजुळव’ करण्यात गुंतले आहेत. - वृत्त/७नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : नोकरी अथवा व्यवसायानिमित्त गावाबाहेर असणाऱ्या मतदारांच्या याद्या तयार झाल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असला तरी मतदानादिवशी त्यांच्या येण्या-जाण्याची सोय कशी करायची, त्याच्या जोडण्याही लावल्या जात आहेत.
प्रचार संपला;जोडण्या सुरू
By admin | Published: February 20, 2017 12:52 AM