जयसिंगपूर : कोथळी-हरिपूर दरम्यान असलेल्या कृष्णा नदीवर नव्याने उभारल्या जात असलेल्या पुलाची पाहणी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शनिवारी केली. पुलाची उभारणी तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी पूल उभारणीसाठी या परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे संपादन शासनाने केले आहे, अशा शेतकऱ्यांना संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याबाबतची माहिती ग्रामस्थांनी राज्यमंत्री यड्रावकर यांना दिली. यावर मंत्री यड्रावकर यांनी प्रांताधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत तातडीने मोबदला देण्याबाबतचे आदेश दिले. २१० मीटर लांबीच्या या पुलासाठी २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मुख्य पुलासाठी नाबार्डकडून १५ कोटी, तर दोन्ही बाजूच्या जोड रस्त्यांसाठी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामधून १० कोटी, तर भूसंपादनासाठी ६.५ कोटीची तरतूद केली होती. २०१९ मध्ये पुलाच्या बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. सध्या पुलाचे दोन्ही बाजूकडून साठ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम जून २०२१ पूर्वी पूर्ण करण्याबाबतचे नियोजन झाले असल्याचे अभियंता रोकडे यांनी सांगितले.
सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणारा पूल वाहतुकीस सोयीस्कर ठरणार आहे. यावेळी पं. स. उपसभापती राजगोंडा पाटील, सरपंच वृषभ पाटील, देवगोंडा पाटील, संजय नांदणे, गौतम इंगळे, रावसो बोरगावे, शीतल पाटील उपस्थित होते.
फोटो - २७०२२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - कोथळी-हरिपूर पुलाची पाहणी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.