कोल्हापूर : इचलकरंजी येथील बालविवाह करून दिलेल्या सख्ख्या बहिणींना पोलिसांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबवून तातडीने हजर करावे, असे आदेश बालकल्याण समितीने मंगळवारी दिले. समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात बालविवाहविरोधी कायदा व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ (पोक्सो) अन्वये गुन्हे दाखल करून कारवाई करावी, असे आदेशही समितीने शिवाजीनगर पोलिसांना दिले आहेत.
समितीच्या बैठकीत हे निर्णय झाले; परंंतु लेखी आदेश आज, बुधवारी पोलिसांना दिले जातील, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.या प्रकरणी मंगळवारी पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मुलींच्या जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने त्यांना समितीसमोर हजर करणे आवश्यक असल्याचे संस्थेच्या अवनी अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले. लोकमतने हे प्रकरण मंगळवारी उघडकीस आणल्यानंतर बालकल्याण समितीपासून राज्याच्या आयुक्तांपर्यंत सगळ्या यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.मूळच्या इचलकरंजीच्या १५ व १३ वर्षांच्या या मुली गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सात दिवस उन्हाळाच्या सुट्टीला म्हणून बालकल्याण समितीच्या परवानगीने गावी गेल्या. वडिलांनीच येऊन त्यांना गावी नेले. परंतु त्यानंतर त्या तब्बल सव्वा वर्ष झाली तरी समितीने व संस्थेनेही या मुली कुठे गेल्या याची चौकशीच केलेली नाही. ज्या मुली सात दिवसांनंतर परत यायला हव्या होत्या, त्या आल्या नाहीत म्हटल्यावर समितीने अवनि संस्थेला जाब विचारायला हवा होता किंवा थेट पोलिसांत तक्रार द्यायला हवी होती.
दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. त्यांची आई त्यांना सोडून गेली आहे. वडील व्यसनी आहेत. त्यामुळे अशा दुभंगलेल्या कुटुंबातील या मुली अगोदरच मानसिकदृष्ट्या खचलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाकडे व संगोपनाकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे होते; परंतु ते दोन्ही पातळ्यांवर दिले गेलेले नाही असे आता स्पष्ट होत आहे. वृत्तपत्रांत बातमी आल्यावरच संस्था आणि समितीही जागी झाली आहे.
अवनि संस्थेच्या तक्रारीनुसार त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या मुली अथणी (कर्नाटक) व खटाव लिंगनूर (जि. सांगली) येथे असल्याची माहिती आहे. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल होतील. वडिलांचा यात सहभाग असेल तर त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करू.- ईश्वर ओमासे, पोलीस निरीक्षकशिवाजीनगर, पोलीस ठाणे इचलकरंजी.
बापरे...! दोन वेळा गर्भपातशिकण्या-बागडण्याच्या वयात या मुलींना मारहाण होत आहे. त्यांचा शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातील लहान मुलीचा तर दोन वेळा गर्भपात केल्याची भीती व्यक्त होत आहे. हे गर्भपात झाले की मुद्दाम कुणी केले हादेखील गंभीर मुद्दा आहे. आता या प्रकरणात पोलिसांत गुन्हे दाखल होणार म्हटल्यावर मुलींच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यासाठी त्यांना सुरक्षितस्थळी दाखल करण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे.पोलीस झाले सरळरविवारी गुन्हा दाखल करायला गेल्यावर शिवाजीनगर पोलिसांनी उडवाउडवीची वागणूक दिली होती. लोकमतने त्याबद्दल फटकारल्यावर मंगळवारी पोलिसांनी या प्रकरणांत गांभीर्याने लक्ष घातले.