उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील जल शुद्धीकरण प्रकल्पाचे काम अपूर्ण असताना काम पूर्ण झाल्याचा दाखला आठ महिन्यांपूर्वीच देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कामाची कोणत्याही प्रकारची माहिती ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नसल्याचे पुढे आले आहे. या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
चिंचवाड येथे तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या फंडातून जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर झाला होता. या प्रकल्पाचे काम हायटेक स्वीट वॉटर टेक्नॉलॉजी सुरत या कंपनीला देण्यात आले होते. या प्रकल्पासाठी जागा ग्रामपंचायत कार्यालयालगतच नियोजित केली होती. त्या जागेवर हा प्रकल्प उभारण्यात आला असून तेथे याचा साचा तयार करण्यात आला आहे. परंतु मोटर व इतर साहित्य जोडले नसताना मात्र ग्रामपंचायत कार्यालयाकडून जलशुद्धीकरण प्रकल्पाची चाचणी देण्यात आली असून पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा चालू केला आहे, अशा आशयाचे पत्र ९ ऑक्टोबर २०२० ला जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाला देण्यात आला आहे. या पत्रावर सरपंच व ग्रामसेवक यांच्या स्वाक्ष-या आहेत. अद्याप काम अपूर्ण असताना ग्रामपंचायतीकडून काम पूर्ण झाल्याचे पत्र कोणत्या कारणामुळे देण्यात आले आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. तसेच या प्रकल्पाचे कोणत्याही प्रकारची माहिती ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
------------
ग्रामपंचायतीने केलेले काम हे अतिशय चुकीचं आहे. याबाबतीत सरपंच व ग्रामसेवक यांनी काम अपूर्ण असताना पूर्णचा दाखला दिला आहे. पाणी कधी सुरू करणार हे वारंवार विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.
अजित चौगुले, सदस्य, सुकाणू समिती