राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांनी घरोघरी फिरून जनसंपर्क वाढविण्याबरोबरच नेतेमंडळींनी छोट्या-मोठ्या बैठका आणि कोपरा सभा घेण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयीन खटलेबाजीमुळे निवडणूक प्रक्रिया लांबल्यामुळे शनिवारी होणारे चिन्ह वाटप प्रलंबित राहिले आहे. अशा परिस्थितीने राजकीय पक्ष वगळता आघाड्या, गट आणि अपक्षांना चिन्हे मिळाली नसल्याने त्यांची प्रचार यंत्रणा काहीशी अडखळली आहे. येथील नगराध्यक्ष पदासाठी कॉँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम या पक्षांसह आणखीन तीन उमेदवार उभे आहेत. तसेच कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शाहू आघाडी विरुद्ध भाजप, ताराराणी आघाडी अशा दोन युती निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय शिवसेनेचे २४ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घ्यायची मुदत ११ नोव्हेंबरला आणि चिन्ह वाटप १२ नोव्हेंबरला होणार होते; पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शीतल आंबी यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्याचा निकालही लागला; पण ज्याठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत न्यायालयीन खटला दाखल झाला आहे, तेथे माघार घेण्यासाठी दोन दिवस (सुट्या वगळता) वाढ देण्यात यावी आणि त्यानंतर लगतच्या दिवशी चिन्ह वाटप करण्यात यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इचलकरंजीत माघार घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी असून, आज, बुधवारी चिन्ह वाटप होणार आहे. दरम्यानच्या काळात गेल्या आठवडाभरापासून उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये घरोघरी फिरून मतदारांशी जनसंपर्क ठेवला आहे. मतदारांशी भेटताना आपण या प्रभागात उभे असून, आपल्याला मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या पक्षांच्या उमेदवारांची निवडणूक चिन्हे निश्चित असल्यामुळे त्यांच्याकडून मतदारांना चिन्ह सांगितले जात आहे; पण शाहू आघाडी, ताराराणी आघाडी आणि अपक्षांना अद्याप चिन्ह मिळत नसल्याने त्यांना मात्र अद्याप आपणाला चिन्ह मिळालेले नाही. चिन्ह मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याकडे येऊन चिन्हाची माहिती देण्यात येईल. तसेच उमेदवाराचे छायाचित्र आणि अन्य माहितीबरोबर चिन्ह छापलेली पत्रकेही वाटली जातील, असे सांगितले जात आहे. १२८ उमेदवारांसमोर चिन्हाचे प्रश्नचिन्ह नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे ४९, राष्ट्रवादीचे ८, भाजपचे ३९, शिवसेनेचे २४, असे उमेदवार उभे आहेत. यांच्याव्यतिरिक्त शाहू आघाडी, ताराराणी आघाडी आणि अपक्ष अशा उमेदवारांची संख्या १२८ आहे. त्यामुळे चिन्ह वाटप झाल्यानंतरच या उमेदवारांना चिन्ह सांगण्यासाठी आणखीन एकदा आपल्या प्रभागाची फेरी करावी लागणार आहे.
आघाड्या, अपक्षांना चिन्हे नसल्याने प्रचार यंत्रणा अडखळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 12:24 AM