कोल्हापूर : उमेदवारांनी समाज माध्यमांचा वापर करताना नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या अधिकृत खात्यावरुनच प्रचार करावा. अनेक खात्यावरुन प्रचार झाल्यास त्याबाबत कारवाई केली जाईल. उमेदवाराच्या संमती शिवाय समाज माध्यमांवरुन अन्य कोणी प्रचार केल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय माध्यम कक्षास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज भेट देवून कामकाजाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते.उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेल्या अधिकृत समाज माध्यम खात्या व्यतिरिक्त उमेदवाराच्या संमती शिवाय कोणी उमेदवाराचा प्रचार करत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, समाज माध्यमाचा वापर करताना उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधिंनी अन्य दुसऱ्या उमेदवाराच्या बाबतीत चुकीची पोस्ट येणे किंवा एका उमदेवाराने मल्टीपल खात्यावरुन पोस्ट होणार नाही, याची दक्षता घ्यावी.प्रतिज्ञापत्रात दिलेल्या खात्यावरुनच समाज माध्यमावरुन प्रचार होत आहे याची खात्री करावी, उमदेवाराच्या नावाने इतर कोणी खाते सुरु करुन उमदेवाराच्या संमतीशिवाय वापर करीत असेल तर अशांवरही कारवाई केली जाईल.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी पेड न्यूज टाळाव्यात, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, एकसारख्याच बातम्या अनेक दैनिकांना प्रसिध्द होत असतील तर त्या पेड न्यूज समजण्यात येतील. याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
पेड न्यूजबाबत तक्रार अल्यास अथवा जिल्हास्तरीय माध्यम कक्षाकडूनही पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हास्तरीय माध्यम कक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियावरील पेड न्यूजबाबतही लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियातील प्रचाराबाबत सायबर सेलसह स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.विधानसभा निवडणूक प्लास्टिक विरहीत करण्यावर निवडणूक आयोगाने भर दिला असून सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक कामकाज प्लास्टिक विरहीत करावे. प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही देसाई यांनी केले.जाहिरात पूर्व प्रमाणिकरणासाठी आवश्यक कागदपत्रेइलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीसाठी उमेदवार अथवा त्यांचा प्रतिनिधी यांच्या हस्ताक्षरातील विहित नमुन्यातील अर्ज, अर्जासोबत दोन संहिता आणि दोन सीडी तसेच जीएसटी भरलेले सीडी निर्मिती कर्त्याचे देयक, प्रतिनिधी नेमला असल्यास उमेदवाराचे तसे पत्र आवश्यक आहे. सीडीमध्ये जुने फुटेज अथवा छायाचित्र वापरले असल्यास त्यावर संग्रहीत हा शब्द असावा.
हिंसक, प्रक्षोपक, धार्मिक-जातीय तेढ निर्माण करणारे दृश्य वा वक्तव्य असू नये. शासकीय अधिकारी यांच्या सोबतचे चित्रण वा छायाचित्रे असता कामा नये. सामाजिक कार्यकर्ते अथवा नेते, थोर व्यक्ती यांच्या सोबतचे चित्रण वा छायाचित्र असल्यास प्रचार व प्रसारासाठी वापरण्यास त्यांचे संमतीपत्र आवश्यक आहे. सीडीच्या शेवटी निर्मिती करणाऱ्या संस्थेचे नाव व संपर्क क्रमांक आवश्यक. यासह हा अर्ज संबंधित विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित मुदतीत सादर करावा.यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्हास्तरीय माध्यम कक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली. या कक्षाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या प्रचारात सोशल मीडिया, पेड न्यूज आणि अन्य माध्यमांवर होणाऱ्या बातम्या आणि जाहिरातींवर करडी नजर ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली. प्रारंभी जिल्हास्तरीय माध्यम कक्षाचे सहायक नोडल अधिकारी एस.आर.माने यांच्यासह कक्षातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.