कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींसाठी उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ७२० सदस्य बिनविरोध निवडून आले असून, ७ हजार ६५७ जण रिंगणात आहेत.
सरपंचपदाच्या आरक्षणाशिवाय लढविल्या गेलेल्या या निवडणुकीत सर्वच प्रभाग सरपंचपदाचे गृहीत धरूनच टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच प्रचाराने वेग घेतला; पण ४ जानेवारीला माघारीनंतर खऱ्या अर्थाने धुरळा उडाला होता. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी पॅटर्नसह स्वत:चाही सोईच्या आघाडीचा पॅटर्न राबवत निवडणूक प्रचंड ईर्षेने लढविली जात आहे. स्थानिक पातळीवरील गट-तट आणि त्याला कौटुंबिक संघर्ष व भाऊबंदकी यांचीही फोडणी मिळाल्याने खऱ्या अर्थाने गावच्या राजकारणाने टोक गाठले आहे. काेणत्याही बड्या नेत्यांच्या प्रचारसभांशिवाय केवळ वैयक्तिक भेटीगाठी, कोपरा सभा, एवढ्यावरच प्रचार सिमित राहिला. बड्या नेत्यांची भूमिका पॅनेल निवड आणि आर्थिक रसदीपुरती सिमित राहिली.
चौकट ०१
तरुण निर्णायक, महिला नावालाच
यंदाच्या या निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आव्हान निर्माण केले आहे. बऱ्याच गावांमध्ये तरुणांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे, तर काही ठिकाणी बिनविरोधमध्ये जागा वाढवून घेतल्या आहेत. गावच्या आखाड्यात तरुण निर्णायक भूमिकेत आले आहेत. महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्याने महिलांनीही प्रचारात कंबर कसली होती. जाहीर प्रचाराबरोबरच हळदी-कूंक कार्यक्रमाद्वारे त्यांनी घर टू घर प्रचारावर भर दिला.
चौकट ०२
तीळगूळ घ्या, मत द्या
मतांचे दान पदरात पाडून घेण्यासाठी संक्रांतीचेनिमित्त साधून घरोघरी वाण म्हणून भेटवस्तू पाठविण्यासाठी उमेदवारांची यंत्रणा राबताना दिसत आहे. आज, गुरुवारी संक्रांतीचा योग साधून तीळगुळाच्या निमित्ताने आजही घरोघरी मतांची देवाणघेवाण होणार आहे.