गडहिंग्लज : आपल्या कामकाजाला आकर्षित होऊन ग्राहक आपल्या संस्थेकडे वळणे हेच खरे चांगले व्यवस्थापन होय. उपलब्ध साधनसामग्रीचे आणि आपल्या श्रमाचे योग्य पद्धतीने उपयोजन करणे म्हणजे व्यवस्थापन होय. यासाठी समन्वय, समोरच्याला समजून घेणे, सहकार्य करणे, कामात क्रियाशील होणे हे महत्त्वाचे आहे. शिकाऱ्याने योग्यवेळी बंदुकीचा चाप ओढला नाही, तर त्याला स्वत:लाच शिकार व्हावं लागतं, हे व्यवस्थापनाचं शास्त्र आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्र. संचालक डॉ. ए. एम. गुरव यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठ व डॉ. घाळी महाविद्यालयातर्फे रवळनाथच्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित ‘व्यवस्थापन विकास कार्यक्रमात’ ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.
गुरव म्हणाले, आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो त्याठिकाणी मनात काही गृहित धरून काम करू नये. दिलेले काम वेळेत व चांगल्या पद्धतीने करणे म्हणजेच उत्तम व्यवस्थापन कौशल्य होय.
प्राचार्य मंगलकुमार पाटील यांचेही भाषण झाले. प्रा. दत्ता पाटील यांनी स्वागत केले. सागर माने यांनी सूत्रसंचलन केले. प्राचार्य आर. एस. निळपणकर यांनी आभार मानले.
यावेळी महेश मजती, मीना रिंगणे, डी. के. मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, एकनाथ केसरकर, बाबासाहेब मार्तंड यांच्यासह सर्व शाखाधिकारी, अकौंटंट, कॅशिअर, क्लार्क उपस्थित होते.