कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने परवाना नूतनीकरण दंड, पाणीपट्टी व फायर सेसमध्ये केलेली वाढ तसेच घरफाळा माफ करावा, अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखालील चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे शुक्रवारी केली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी ३ महिने व यावर्षी जवळपास ११५ दिवस अत्यावश्यक व जीवनावश्यक व्यापार सोडून उर्वरीत सर्व व्यापार बंद होता. कोल्हापूर शहरात गेल्या महिन्यात अतिवृष्टी होऊन महापूर आलेला होता. लॉकडाऊन व महापुरामध्ये सर्व व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, व्यावसायिकांना सवलत द्यावी, असे आमदार जाधव यांनी सांगितले.
परवाना नूतनीकरण मुदत दि. ३० सप्टेंबरपर्यंत वाढवून द्यावी. परवाना नुतनीकरण मुदत संपल्यानंतर १५ टक्के व २० टक्के दंड आकारला जाऊ नये. तो पूर्वीप्रमाणेच १० टक्के इतका आकारला जावा. तसेच पाणीपट्टीमध्ये केलेली दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, लॉकडाऊन व महापुराने झालेल्या नुकसानीमुळे व्यापाऱ्यांचा यावर्षीचा संपूर्ण घरफाळा माफ करावा, अशी आग्रही मागणीही करण्यात आली.
यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, संचालक अजित कोठारी, राहुल नष्टे, प्रशांत शिंदे, संपत पाटील आदी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १३०८२०२१-कोल-केएमसी०१
ओळ - कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, संजय शेटे, शिवाजी पोवार उपस्थित होते.