कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया-स्पोर्टस् इन्फ्रा स्ट्रक्चर’ योजनेंर्तगत पायाभूत क्रीडा सुविधा निर्मितीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने साडेपाच कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला महासभेची मंजुरी घेऊन क्रीडा कार्यालयाकडे पाठविला जाणार आहे. त्यात ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये अॅस्ट्रो टर्फसह अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.केंद्र सरकारच्या या योजनेत सिंथेटिक हॉकी मैदानाकरिता साडेपाच कोटींचे अनुदान महापालिकेला मिळणार आहे. याकरीता महापालिकेने ६ कोटी ४० लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. यासह ध्यानचंद हॉकी स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी एकूण ११ कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिका प्रकल्प विभागाने तयार केला आहे. केंद्राचे साडेपाच कोटींहून अधिक होणारी उर्वरित रक्कम महापालिका उभी करणार आहे.हा प्रस्ताव ३१ आॅक्टोबर २०१६ या मुदतीत सादर होणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या महासभेपुढे या प्रस्तावाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेला प्रस्तावाबरोबर अंदाजपत्रक व आराखडा, जागेबाबतची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. मिळणाऱ्या अनुदानाशिवाय महापालिकेला जादाचा खर्च स्वत: करून प्रकल्प पूर्ण करण्याबाबतचे हमीपत्रही सोबत जोडावे लागणार आहे. प्रस्तावाला प्रथम आयुक्तांची मंजुरी आवश्यक आहे. त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर तो महासभेपुढे ठेवावा लागणार आहे तेथून क्रीडा कार्यालयाक डे जमा करावा लागणार आहे. त्यानंतर या प्रस्तावाचा प्रवास भारतीय खेल प्राधिकरणाकडे होणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालय स्तरावर छाननी होणार. त्यातून साडेपाच कोटींना मंजुरी मिळणार आहे.त्यामुळे हा प्रस्ताव तत्काळ महापालिकेला परिपूर्ण करून पाठवावा लागणार आहे. अन्यथा मुदत निघून गेल्यानंतर पुन्हा पुढील वर्षाची वाट या स्टेडियमच्या कायापालटासाठी पाहावी लागणार आहे. ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये सिंथेटिक अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदान होणे गरजेचे आहे. खेळाडूंना ही सुविधा मिळाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे हॉकीपटू चमक दाखविणार नाहीत. त्यात केंद्र सरकारकडून ‘खेलो इंडिया’अंतर्गत अॅस्ट्रो टर्फ घेण्यासाठी आयती संधी आली आहे. त्याकरिता परिपूर्ण प्रस्ताव महापालिका प्रशासन, पदाधिकारी यांनी तत्काळ क्रीडा खात्याकडे पाठविण्याची गरज आहे. - विजय साळोखे, अध्यक्ष , कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशन
‘खेलो इंडिया’अंतर्गत साडेपाच कोटींचा प्रस्ताव
By admin | Published: September 20, 2016 1:11 AM