लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेची ३० जून रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. सभेत शहापूर गट नं. ४६२ व ४६३ या जागेवरील भागश: अॅग्रीकल्चरल अॅण्ड नो डेव्हलपमेंट व भागश: वॉटर बॉडीऐवजी एकत्रित औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र असा फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी मंजुरीस असून तो रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका सरिता आवळे यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले.
निवेदनात, शहर सौंदर्यीकरणातून शासन निर्णयानुसार नगरपालिकेने शहापूर गट नं. ४६२ व ४६३ या जागेवरील खणीसाठी १ कोटी रुपये खर्च केले आहेत. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी व पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून गेल्या ६ वर्षांपासून गणेशमूर्तींचे विसर्जन या खणीमध्ये केले जाते. तसेच खणीच्या आसपास शाळा, कॉलेज व रहिवासी आहेत. असे असतानाही इचलकरंजी सीईटीपी टेक्सटाइल लि. यांच्या खरेदीपूर्व करारपत्राच्या आधारावर नियोजन समितीच्या शिफारशीवरून प्रस्ताव सर्वसाधारण सभेत घेतला आहे. त्यामुळे सदरचा विषय रद्द करावा, असे म्हटले आहे.