कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी पूर्ण लांबीचा चित्रपट करण्याचा प्रस्ताव सारथीकडे दिला असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी दिली.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा कोल्हापूरातील पहिला प्रयोग आज, शुक्रवारी येथील तपोवन मैदानात होत आहे. त्यानिमित्ताने डॉ. कोल्हे यांनी सायंकाळी शाहू समाधीस्थळावर राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, शाहू महाराजांचा विचार पोहोचविण्यासाठी चित्रपट बनविण्याचा प्रस्ताव सारथी संस्थेकडे गतवर्षी एप्रिल महिन्यात दिला आहे. सारथीच्या बजेटमध्ये तसेच घटनेमध्ये याची तरतूद आहे. लोगोमध्ये शाहू महाराजांचा फेटा आहे. या चित्रपटाचे शूटींग कोल्हापूरात होईल. त्यासाठी भव्य सेट उभारण्यात येईल. हा सेट कायमस्वरुपी कोल्हापूरात पर्यटन माहिती केंद्र म्हणून राखून ठेवला जावा असा प्रस्ताव एप्रिलमध्ये सारथीकडे पाठविल्याचे कोल्हे यांनी सांगितले. शाहू महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींचा केवळ इतिहास नव्हे तर त्यामागचा कार्यकारणभाव उलगडणारे अनेक प्रसंगांचे भव्य सेट कायमस्वरुपी जतन करुन त्यातील प्रसंग येणाऱ्या पिढीसाठी तसेच पर्यंटकांना प्रेरणादायी ठरतील असा विश्वासही डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.
शाहू महाराज समाधीस्थळ आणि जन्मस्थळाचा विकास अद्याप अपूर्ण असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, उपशहर जलअभियंता नारायण भोसले, युवराज साळोखे आदी उपस्थित होते. यावेळी शाहू महाराजांवरील व्यवस्था : काल, आज हा ग्रंथ चंद्रकांत पाटील यांनी भेट दिला.
महानाट्याची रंगीत तालीम
डॉ. कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगास आजपासून तपोवन येथील मैदानात प्रारंभ होत आहे. या नाटकाची रंगीत तालिम गुरुवारी डॉ. कोल्हे, डॉ. गिरीश ओक, प्राजक्ता गायकवाड, महेश कोकाटे, रमेश रोकडे, अजय तापकिरे, विश्वजित फडते या प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत झाली. या महानाट्यात कोल्हापूरबाहेरील सुमारे ८० आणि कोल्हापूरातील १०० कलाकारांचा संच सहभागी झाला आहे.
फोटो : ०६०४२०२३-कोल-शाहू समाधी-अमोल कोल्हेफोटो ओळी : कोल्हापूरात शाहू महाराजांच्या समाधीस्थळावर खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराजांना पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी आदिल फरास, नारायण भोसले उपस्थित हाेते.