कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक छत्रपती शाहू टर्मिनल्स स्टेशनवरील मुख्य प्लॅटफॉर्म नंबर एक व दोनची उंची वाढविण्याच्या मागणीचा प्रस्ताव अखेर मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने मंजूर केला. याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार आहे. मात्र, या निर्णयाची प्रत किंवा माहिती येथील स्टेशन प्रबंधकांना अद्याप मिळालेली नाही.मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील सर्व प्लॅटफॉर्मच्या उंची वाढविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये मार्च २०१५ अशी डेडलाईनही मध्य रेल्वेला घालून दिली आहे. त्यानुसार कोल्हापुरातील छत्रपती शाहू टर्मिनल्सचाही या प्लॅटफॉर्म उंची वाढविण्याच्या प्रस्तावात समावेश आहे. मुख्यत्वे करून प्लॅटफॉर्म नंबर एक व प्लॅटफॉर्म नंबर दोन या दोन प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. येथे रेल्वेच्या बोगीत प्रवेश करताना व उतरताना प्रवाशांना दीड फूट ते दोन फुटांचा गॅप राहतो. त्यामुळे रेल्वेरूळ आणि बोगीच्या प्रवेशद्वारामधून उतरताना प्रवासी मधल्या पोकळीत अडकून अपघाताची शक्यता आहे. या धोकादायक प्लॅटफॉर्ममुळे वयोवृद्ध व मुलांना घेऊन चढताना धोका आहे. आजही प्रवाशांना उतरताना कसरत करावी लागते. त्यानुसार प्रवासी संघटनांकडून मध्य रेल्वेकडे वारंवार मागणी केली होती. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशाने न्याय दिल्याची भावना प्रवासीवर्गात आहे. मध्य रेल्वेच्या मुख्यालयातून हा प्रस्ताव मंजूर झाल्याच्या माहितीला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)प्लॅटफॉर्म एक व दोनची उंची वाढविण्याबाबत अद्यापही आपल्याकडे कोणत्याही प्रकारच्या कार्यालयीन निर्णयाची प्रत अथवा आदेश आलेला नाही. त्यामुळे उंची वाढविण्याबाबत अजूनही काहीही सांगता येत नाही. पुणे येथील कार्यालयाकडे अधिक माहिती आहे. प्रस्ताव मंजुरीची प्रत आपल्याकडे आल्यास याबाबत सांगता येईल. - मीना सुग्रीव, स्टेशन प्रबंधक, कोल्हापूर रेल्वे स्टेशन
प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर
By admin | Published: November 07, 2014 12:02 AM