कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका व महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील १८ गावांतील सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, या व्यापारी संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल महिन्यापासून अत्यावश्यक सेवेतील वगळता जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद आहेत. कोल्हापूर शहराचा पॉझिटिव्ह रेट ग्रामीणच्या तुलनेत कमी असल्याने सोलापूरच्या धर्तीवर शहर व ग्रामीण वेगवेगळे करून शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे. याबाबत सोमवारी सकाळी पोलीस प्रशासन व व्यावसायिकांची बैठक झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्याची दखल घेऊन तातडीने दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणची बैठक झाली. यात जिल्हाधिकारी देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.
या वेळी व्यापारी संघटनेच्या मागणीच्या प्रस्तावावर राज्य शासन स्तरावर निर्णय होण्यासाठी तो आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवण्याचा व विभागाकडून येईल त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत राज्य शासनाने स्तर ४ साठी घालून दिलेले निर्बंध कोल्हापूरसह अन्य ६ जिल्ह्यांनादेखील लागू असल्याने त्याचे व्यावसायिकांनी पालन करावे, अन्यथा कारवाई करण्याच्या सूचनादेखील या वेळी देण्यात आल्या.
--
महापालिकेने माहिती सादर करावी
या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर महापालिका क्षेत्राची लोकसंख्या, मागील दहा दिवसांत झालेल्या आरटीपीसीआर चाचण्या व पॉझिटिव्ह रेट याची माहिती महापालिकेने सादर करावी. ही माहिती या प्रस्तावासोबत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाला सादर करता येईल. तसेच प्राधिकरणातील गावांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना केल्या.
--
फोटो नं २८०६२०२१-कोल-कलेक्टर बैठक
ओळ : कोल्हापूर शहरातील दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी या व्यावसायिकांच्या मागणीवर सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली.