कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती जपण्यासह रोजगारनिर्मितीसाठी शाहू मिलच्या १२ एकर हेरिटेज जमिनीमध्ये भव्य स्मारक, तर उर्वरित २४ एकरमध्ये एखादी टेक्स्टाइल मिल अथवा गारमेंट पार्क असा उद्योग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर सुरू करण्याचा विचार आहे. स्मारकाचा खर्च शासन करील. त्याबाबतचा प्रस्ताव वस्त्रोद्योग विभागाचे सचिव तयार करतील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शाहू मिलचा भोंगा सुरू करण्याबाबत लवकर निर्णय होईल. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच शिवाजी विद्यापीठाला सुवर्णमहोत्सवी निधीतील १० कोटी रुपये मिळाले. गेल्या अडीच वर्षांत प्रशासन नावाचा विषय नव्हता. त्यामुळे उर्वरित ४० कोटी मिळाले नाहीत. हा निधी डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने दिला जाईल. राज्यातील सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या २०७२ जागांच्या भरतीचा आदेश काढला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांची घोषणा लवकर होईल
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ असतानाही राज्यातील खूप मोठे निर्णय अगदी सहजपणे झाले आहेत. पालकमंत्री आहेत की नाही याच्याशी निर्णय जोडलेले नसतात. नियोजन समितीचे सचिव जिल्हाधिकारी असून, त्यांच्याशी नियमितपणे संवाद सुरू आहे. पालकमंत्र्यांची घोषणा लवकर होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
...तर उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ आली नसती
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ठाणे, मुंबईवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे, अशी विचारणा मंत्री पाटील यांना केली असता ते म्हणाले, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार, स्वातंत्र्य आहे. त्यानुसार त्यांनी केले असेल. असा प्रवास आणि लक्ष केंद्रित जर उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी केले असते, तर बहुधा त्यांच्यावर अशी वेळ आली नसती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामतीमध्ये जाणार आहेत. राज्यातील १६ पैकी १२ खासदार हे शिवसेनेचे होते. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे झाले आहेत. त्याठिकाणी आम्ही करीत असलेल्या प्रयत्नांचा त्यांना फायदा होणार आहे.