इंदुमती गणेश ।कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या परस्थ भाविकांसाठी यात्री निवास उभारण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने ताराबाई रोडवरील खरेदी करण्यात येत असलेल्या जागेच्या रकमेवर न्याय व विधी खात्याने आक्षेप घेतला आहे. बाजारभावानुसार ८ हजार ६४७ चौरस फूट जागेची किंमत १० कोटी ३७ लाख होते; मात्र समितीने ही जागा ११ कोटी ५० लाखांना घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर न्याय व विधी खात्याने ही जागा बाजारभावानुसारच घ्यावी, असे पत्र देवस्थान समितीला पाठवले आहे.
श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी वर्षाला ५० ते ६० लाख भाविक येतात; मात्र देवस्थान समितीचे यात्री निवास व अन्नछत्र नसल्याने भाविकांना जादा पैसे मोजून खासगी यात्री निवास व लॉजिंगचा आसरा घ्यावा लागतो; त्यामुळे देवस्थान समितीच्या वतीने मंदिर परिसरातील जागेचा शोध सुरू होता. दरम्यान, ताराबाई रोडवरील सुवर्णा राजेंद्र निंबाळकर व कुटुंबीयांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये ८ हजार ६४७ चौरस फूट जागेचा प्रस्ताव देवस्थानला दिला. सुरुवातीला त्यांनी जागेची किंमत १६ कोटी इतकी सांगितली होती. नंतर ती १४ कोटी २५ लाखांवर आली.
रेडीरेकनरप्रमाणे या जागेची किंमत २ कोटी ५५ लाख २५ हजार रुपये इतकी होते. रेडिरेकनर आणि बाजारभावात तफावत जास्त असल्याने या रकमेत जागाखरेदीचा व्यवहार होणार नव्हता; त्यामुळे देवस्थानने एल. एम. करनाळे व अनिल हराळे या दोन शासनमान्य व्हॅल्युएटरकडून जागेचे बाजारभावानुसार मूल्यांकन करून घेतले. या दोघांनीही जागेची १० कोटी ३७ लाख ७६ हजार रुपये, अशी किंमत निश्चित करून दिली.
या रकमेला निंबाळकर तयार नसल्याने समितीने तब्बल १२ कोटी एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा तोट्याचा व्यवहार होणार होता आणि बाजारभावापेक्षा १ कोटी ६३ लाख इतकी जास्त रक्कम देण्याला समितीतील एका पदाधिकाºयाने बैठकीतच तीव्र विरोध केला; त्यानंतर झालेल्या वाटाघाटी आणि चर्चेनंतर समितीने साडेअकरा कोटींची रक्कम निश्चित केली. निंबाळकर यांनी साडेअकरा कोटींना जागा विकण्यास तयार असल्याचे पत्र समितीला दिले.
मोक्याची जागा असल्याने दिलेली रक्कम योग्यच असली तरी हा व्यवहार होताना काहींचे हात ओले होणार होते. एवढी एकरकमी रक्कम तुम्हाला अन्य कोणांकडून मिळणार नाही, त्यामुळे देवस्थानचा प्रस्ताव स्वीकारा, असा आग्रह झाल्याने निंबाळकर यांनीही त्यास संमती दिल्याची माहिती समितीच्याच विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. खरेदी व्यवहाराचा प्रस्ताव न्याय व विधी खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता; मात्र नवरात्रौत्सवा दरम्यान खात्याने देवस्थानला पत्र पाठवून ही जागा बाजारभावानुसारच खरेदी करा, अशी सूचना केली आहे; त्यामुळे समितीच्या पुढील बैठकीत यावर निर्णय होणार आहे.
भाविकांसाठी यात्री निवास व अन्नछत्रसाठी मंदिरापासून जवळ असलेली ही जागा आम्हाला योग्य वाटली. साडेअकरा कोटी ही रक्कम बाजारभावापेक्षा जास्त आहे हे खरे आहे; ही बाब आम्ही न्याय विधि खात्याला कळवून साडेअकरा कोटींचा प्रस्ताव दिला होता.- महेश जाधव, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती