कोल्हापूर : महापुरात कोसळलेल्या मतदान केंद्रांचे, तसेच दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या केंद्रांचा तातडीने आढावा घेऊन याबाबतचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना येथे जिल्हा निवडणूक विभागाला दिले.विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग(व्हीसी)द्वारे संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून ‘व्हीसी’द्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ उपस्थित होते.विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या तयारीसंदर्भात विचारणा केली. ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावर ही तपासणी लवकरात लवकर पूर्ण करावी असे सांगितले.
महापुरामुळे जी मतदान केंद्रे पडली आहेत, तसेच मोडकळीस आली आहेत, त्यांचा आढावा घेऊन त्याबाबत प्रस्ताव तातडीने पाठवावा; त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे खराब झालेली निवडणूक ओळखपत्रे बदलून देण्यासाठी मोहीम राबवून ओळखपत्रे देण्याचे काम लवकर पूर्ण करा, असे निर्देश म्हैसेकर यांनी दिले. यावर पावसामुळे खराब झालेल्या ओळखपत्रांसंदर्भात आज, शनिवारी विशेष मोहीम घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.४ हजार ३४० ‘व्हीव्हीपॅट’ दाखलविधानसभा निवडणुकीसाठी यापूर्वी ५०० व्हीव्हीपॅट यंत्रे तमिळनाडूहून दाखल झाली आहेत. उरलेली ४,३४० व्हीव्हीपॅट यंत्रे गुरुवारी रात्री कोल्हापुरातील राजाराम तलाव येथील शासकीयय गोदाम येथे दाखल झाली. या ठिकाणी ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू आहे.