पेठवडगाव : वडगाव शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यास स्थगिती देत असून, हद्दवाढ झाल्यानंतर शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन नवीन विकास आराखड्यास परवानगी देण्यात येईल. पालिकेच्या नवीन इमारतीसाठी पाच कोटींचा निधी दिलेला आहे. आणखी लागेल तेवढा निधी दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या घोषणेचे शहरातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.
येथे पालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा तसेच शिवराज्य भवन बांधकामाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार राजू आवळे प्रमुख उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “थांबतो, बघतो, करतो ही राजकीय भाषा लोकांना आवडत नाही. त्यासाठी महायुतीने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवून लोकांची कामे केली आहेत. याचा लाभ राज्यातील चार कोटी लोकांना झाला आहे. घरात बसून फेसबुक लाइव्ह करून नाही तर फेस टू फेस सरकार चालवावे लागते. त्यासाठी इच्छाशक्ती लागते. ते आम्ही करून दाखवित आहोत.”
खासदार धैर्यशील माने म्हणाले, प्रस्तावित विकास आराखडा नागरिकांच्या घरावरून नांगर फिरविणारा आहे. तो तत्काळ स्थगित करावा. नंतर त्याचा विचार करावा. पालिका तसेच सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक, रिंगरोड यासाठी भरीव निधी द्यावा.माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी म्हणाले, सत्तेवर असताना शहराच्या विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या. शासनाच्या विविध उपक्रमांत, स्पर्धेत सहभाग घेऊन अव्वल क्रमांक पटकावला.
यावेळी नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक सुमित जाधव, संजय गांधी निराधारचे अध्यक्ष झाकिर भालदार, विकास माने, प्रताप देशमुख, अभिनंदन सालपे, भीमराव साठे, सुनीता पोळ आदी उपस्थित होते.स्थगितीचे पत्र दिलेमुख्यमंत्री शिंदे यांनी विकास आराखड्यास स्थगिती देत असल्याचे पत्र प्रविता सालपे यांच्याकडे दिले. ते पत्र वाचून दाखविले. विकास आराखडा रद्द होण्याचा आम्ही दिलेला शब्द खरा करून दाखविला, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.