संदीप आडनाईक कोल्हापूर : कोकणात मच्छिमारांच्या जाळ्यांमुळे अपंग झालेल्या संरक्षित समुद्री ऑलिव्ह रिडले कासवाला कृत्रिमरित्या पाय बसविण्याचा देशातील पहिलाच प्रयोग कोल्हापुरात यशस्वी झाला आहे. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर आणि त्यांच्या मदतनिसांनी अथक प्रयत्न करून या कासवाला जीवदान दिले. टर्टल सर्व्हायवल अलायन्स संस्थेचे संचालक शैलेंद्र सिंग यांनी देशात प्रथमच हा प्रयोग झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.शेड्यूल्ड वनमध्ये समाविष्ट असलेले हे कासव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जायबंदी अवस्थेत वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्यावर सोमनाथ वेंगुर्लेकर यांना माशाच्या जाळ्यात अडकलेले दिसले. कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू, सिंधुदुर्ग या संस्थेचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी कासवाला बाहेर काढून कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.
या कासवाचा पुढचा डावा पाय जाळ्यात अडकून पूर्णपणे तुटला होता तर मागील उजवा पाय तुटून पडण्याच्या मार्गावर होता. महिनाभर गाळात अडकल्याने कासवाची प्रकृती गंभीर होती. कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तत्काळ सावंतवाडी उपवन संरक्षक एस. डी. नारणवर यांच्या सूचनेनुसार त्याला कोल्हापूरच्यावन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राकडे पुढील उपचारासाठी दाखल केले.कोल्हापूर वनवृत्ताचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी २५ दिवस उपचार व संगोपन करून कासवाचा जीव वाचविला. कासवाची प्रकृती स्थिरावली, परंतु दोन्ही पाय निकामी झाल्याने हे कासव पाण्यात पोहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या कासवाला कृत्रिम पाय बसविण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी (दि. २७) यशस्वी शस्त्रक्रिया केली.तयार केला कृत्रिम पायकासवासाठी कृत्रिम पाय तयार करण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे कलाकार चंद्रकांत हल्याळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी १० दिवसात कासवाच्या उजव्या पायाच्या आकारमानानुसार डाव्या पायाची क्लेपासूनची प्रतिकृती बनविली. स्माईल डेंटल लॅबचे कृष्णात पोवार यांनी डेंटल इम्प्रेशनमध्ये पायाचा तसेच सांध्याचा साचा तयार केला. प्रदीप कुंभार यांच्या मदतीने महत्प्रयासाने मिळविलेल्या सिलीकॉनचा वापर करून पहिल्याच प्रयत्नात कृत्रिम पाय तयार केला.यशस्वी शस्त्रक्रियातासभर चाललेल्या या शस्त्रक्रियेसाठी आणि संगोपनासाठी प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी व केअर टेकर अमित कुंभार, वंशिका कांबळे, सानिका सावंत, हृषीकेश मेस्त्री, आकाश भोई, यश खबाले, अवधूत कुलकर्णी, प्रदीप सुतार यांनी मदत केली. पाय बसताच दीड महिना जागेवरच अडकलेल्या या कासवाने तत्काळ कृत्रिमरित्या तयार केलेल्या पाण्यात हालचाल सुरू केली.