प्रदीप शिंदे।कोल्हापूर : पक्षी हे पर्यावरणाचे मापदंड असतात. विविध जातींच्या वेगवेगळ्या अधिवास असलेल्या भरपूर पक्ष्यांची संख्या ही समृद्ध पर्यावरणाचे पुरावे आहेत. शिवाजी विद्यापीठ परिसरात असलेले मुबलक पाणी, जैवविविधतेने समृद्ध यामुळे पक्ष्यांना हा परिसर सुरक्षित वाटू लागल्याने या परिसरात त्यांचा अधिवास वाढवत असून, त्यांची एकप्रकारे कॉलनीच तयार होत आहेत.
आधुनिकीकरणाच्या युगात निसर्ग साधनसंपत्तीवर मोठ्या प्रमाणावर संकट येत आहेत. त्यात शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजिवांचे अधिवास, जैविक संपत्तीला अमर्यादा येत असताना शिवाजी विद्यापीठ परिसरात पक्षी, फुलपाखरे, सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढत आहे. या सर्वांचा शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या वतीने निरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी परिसरातील पक्षी, फुलपाखरे, साप यांच्यासह विविध जैवविविधेतच्या नोंदी केल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील
प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी व कर्मचारी यांनी नियोजनबद्ध विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. तसेच सर्व परिसरात नैसर्गिक पाण्याचा स्रोत नियोजनबद्ध केल्याने मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा परिसर हिरवागार बनला आहे.
अशी घेतली नोंदशिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या नोंदी करण्यात आल्या. विद्यापीठाच्या ८५५ एकर परिसराची ४६ भागांमध्ये विभागणी करण्यात आली. प्रत्येक भागासाठी दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांच्यामार्फत त्या भागातील त्या परिसरातील झाडे, पाणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, जलचर प्राणी यांची नोंद घेतली.
- तीन तलाव : शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात राजाराम तलाव, भाषा भवन आणि संगीत विभागाच्या पाठीमागील बाजूस तीन प्रकारची मोठी तळी आहेत. या ठिकाणी स्थलांतरित पक्षी पण येत आहेत.
- १३ हजार ४७३ झाडे : शिवाजी विद्यापीठ परिसरात १३ हजार ४७३ विविध प्रकारची झाडे आहेत. यामध्ये १३६ प्रकारची विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत. १५ प्रकारचे साप आहेत. त्यामध्ये ११ बिनविषारी, तर चार विषारी साप आहेत. चार प्रकारचे सरडे आहेत. दोन प्रकारचे कासव आहे. ५९ प्रकारची फुलपाखरे आहेत. यांसह ससे, रानमांजर, भटकी कुत्रीपण आहेत.
- कॉलनी : परिसरातील ठरावीक भागांमध्ये वटवाघूळ, घुबड यांचा अधिवास आहे. त्यांच्यासह विदेशी पक्ष्यांची घरटी वाढत आहेत. त्यामधून त्यांची कॉलनीच तयार होत आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात असलेल्या वृक्षांचे जतन करून नव्याने लावण्यात आलेल्या वृक्षलागवडीमुळे हा परिसर हिरवागार झाला आहे. येथील नैसर्गिक पाण्याच्या स्रोताचे जतन केल्याने पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. अशा सर्व घटकांमुळे विद्यापीठ परिसर जैवविविधतेने समृद्ध झाला आहे. त्यामुळे पक्ष्यांसह अन्य प्राण्यांची संख्या वाढत आहेत.- डॉ. पी. डी. राऊत, पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख