राम मगदूम
गडहिंग्लज : रात्री दहाच्या सुमारास शेताकडून घरी निघालो होतो, रात्रीच्या अंधारात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी आमच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. गव्यांना हुसकावून आलो..पण, सापडलो अस्वलांच्या तावडीत. नशीब बलवत्तर म्हणूनच आम्ही वाचलो. या घटनेचा साक्षीदार असणाऱ्या सुरेशकडून हल्याचा थरार ऐकणाऱ्यांच्या अंगावरही काटे उभारल्यावाचून राहत नाहीत.हकीकत अशी, चंदगडपासून १५ किलोमीटर अंतरावर आणि बाजार कानूरपासून ६ किलोमीटरवर सुमारे ९०० लोकवस्तीचे पिळणी गाव आहे. त्या गावात रविवारी (१९) रात्री ही घटना घडली. त्यात उत्तम तुकाराम गावडे (वय ३६) हा गंभीर जखमी झाला आहे. अस्वलाने लचके तोडल्यामुळे त्याच्या डाव्या पायाला सुमारे ९० टाके पडले आहेत.जंगल क्षेत्र आणि फाटकवाडी धरणाच्या पाण्यामुळे अलिकडे पिळणीसह परिसरातील आजूबाजूच्या खेड्यातील शिवारात जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. रानगवे, अस्वल, हत्ती आदी जंगली प्राणी याठिकाणी जणू मुक्कामालाच आहेत. घटप्रभा बारमाही झाली तरी एकही पीक हाताला लागणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना रात्रं-दिवस पिकांची रखवाली करावी लागते.रविवार (१९) रात्री सुरेश व त्याचा लहान भाऊ उत्तम दोघेही नेहमीप्रमाणे गव्यांच्या रखवालीसाठी पिळणीपासून सुमारे २ किलोमीटरवर असणाऱ्या भात शेतीकडे गेले होते. तोंडाने आवाज काढून व डब्बे वाजून त्यांनी रानगव्यांना हुसकावून लावले. गवे माघारी परतल्यानंतर त्यानी घरची वाट धरली.दरम्यान, गावालगतच्या पाणंद रस्त्यात समोरून आलेल्या दोन अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. काठीशिवाय दोघांच्याही हातात कांहीच नव्हते. समोर असणाऱ्या उत्तमला खाली पाडून अस्वलाने त्याच्या पायाचे लचके तोडायला सुरूवात केली. त्यावेळी सुरेशने जीवाच्या आकांताने आरडाओरडा करून अस्वलांना काठीने हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अस्वलांनी जंगलाकडे धूम ठोकली.जखमी उत्तमला सुरेशने खांद्यावरून गावात नेले. त्यानंतर त्याला सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्या चारचाकीतून चंदगड ग्रामीण रूग्णालयात व त्यानंतर गडहिंग्लजच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले, तोपर्यंत रात्रीचे बारा वाजून गेले होते.आमने-सामने..!पिळणीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पाणंदीच्या वळणावर गावाकडून जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या अस्वलांची आणि शेताकडून घराकडे जाणाऱ्या गावडे बंधूंची आमने-सामने गाठ पडली. त्यामुळे दोघांची घाबरगुंडी उडाली. परंतु, पाणंदीलगतच्या कुंपणामुळे त्यांना आणि अस्वलांनाही बाजूला जाता आले नाही. दरम्यान, बॅटरीच्या उजेडामुळे बिथरलेल्या अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ले नित्याचेच झाले..!अलिकडेच सडेगुडवळे येथील एका शेतकऱ्यावरही अस्वलाने हल्ला केला होता. भोगोली, पिळणी, झांबरे, उमगाव या परिसरात शेतकरी आणि पाळीव जनावरांवरील जंगली प्राण्यांचे हल्ले नित्याचेच झाले आहेत. सध्या शेतात खाण्यासाठी पिके नसल्यामुळे फणस खाण्यासाठी अस्वले गावाशेजारी आली होती. फणस खावून जंगलाकडे परतताना त्यांनी हा हल्ला केला. शेतमजूर कुटूंब..गावडे यांची केवळ दीडएकर शेती आहे. जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे ते केवळ भाताचेच पीक घेतात. इतरवेळी शेती कामासाठी ते मजुरीला जातात. किमान पोटापुरते भात मिळावे म्हणून जीवाची पर्वा न करता भातशेतीची रखवाली करताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला.