कोल्हापूर : राज्यातील सहकारी पतसंस्थांकडील एक लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्याची राज्य शासनाची भूमिका असून, यासाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र सहकार विकास मंडळ काम करील, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात कोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, महाराष्ट्र सहकार विकास मंडळाचे कार्यकारी संचालक मिलिंद आकरे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक लेखापरीक्षण तुषार काकडे, कोल्हापूरचे जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सांगलीचे जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन शंकर पाटील, वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अनिल पाटील, आदी उपस्थित होते.मंत्री देशमुख म्हणाले, सहकारी संस्थांच्या विशेषत: पतसंस्थांच्या निकोप वाढीसाठी सहकारात शिस्त आणि पारदर्शकता जोपासून सभासदहितास प्राधान्य देणे गरजेचे आहे. चांगल्या आणि दर्जेदार पतसंस्थांची संख्या वाढविणे आवश्यक असून, अडचणीतील पतसंस्थांना ‘एमसीडीसी’च्या माध्यमातून साहाय्य करून त्या सक्षम आणि आदर्श बनविण्यासाठी शासन पुढाकार घेईल.शंकर पाटील म्हणाले, जिल्ह्यातील पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून ‘एमसीडीसी’ला भाग भांडवलाप्रती एक कोटी उपलब्ध करून दिले जाईल. संतोष पाटील यांनी स्वागत केले
कर्ज वितरणासाठी तीन सदस्यांची समितीअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना विविध व्यवसाय उद्योगासाठी देण्यात येणाºया कर्जाचे व्याज शासन भरणार आहे. राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बँकांनी या कर्जयोजनांमध्ये सक्रिय होऊन अधिकाधिक तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्याची भूमिका घ्यावी. कर्ज वितरणासाठी जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधकांसह तीन सदस्यांची समिती स्थापन करून ही कर्जप्रकरणे मंजूर करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे मंत्री देशमुख म्हणाले.
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित कोल्हापूर विभागातील सहकारी पतसंस्थांच्या विशेष बैठकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. संतोष पाटील, मिलिंद आकरे, धनंजय डोईफोडे, तुषार काकडे, अरुण काकडे, नीलकंठ करे, शंकर पाटील, आदी उपस्थित होते.