लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरामध्ये दिलेल्या कामाच्या ठेकेदारांचा नगरपालिकेने धनादेश काढला आहे. परंतु, अंतिम टप्प्यात असलेल्या शिवतीर्थ कामाचे धनादेश न काढल्याने बांधकाम सभापती उदयसिंह पाटील व शिवसमर्थकांनी नगराध्यक्ष प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. तसेच घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, त्याचा धनादेश मिळण्यासाठी पाटील हे आठ दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, इतर ठेकेदारांना धनादेश दिला असून, शिवतीर्थ कामाचाच का धनादेश निघाला नाही, असे म्हणत निषेध केला. प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी, या कामाचा धनादेश देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. आंदोलनात पै. अमृत भोसले, भाऊसाहेब आवळे, संतोष जाधव, नितीन कोकणे, संतोष सावंत, संजय जाधव, आदी सहभागी झाले होते.