मिलिंद देशपांडे
दत्तवाड : दूधगंगा नदीचे पाणी इचलकरंजीला सुळकुड येथून देण्याच्या विरोधात आज, बुधवारी शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, दत्तवाड, दानवाड, टाकळीवाडी येथे कडकडीत बंद पाळून शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, कुरुंदवाड पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त तैनात केला होता.अमृत दोन योजनेअंतर्गत इचलकरंजी शहराला कागल तालुक्यातील सुळकुड येथून दूधगंगा नदीचे थेट पाईपलाईनने पाणी देण्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली. १६१ लाखांच्या या योजनेला दूधगंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. इचलकरंजी शहरा लगत असणाऱ्या पंचगंगा नदी व कुरुंदवाड येथील कृष्णा नदीतून थेट पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा योजना यापूर्वी सुरू आहे. पण कृष्णा पाणी योजनेला गळती असल्यामुळे अपुरा पाणीपुरवठा होतो. यामुळे शासनाने नवी पाणीपुरवठा योजना करण्याचे ठरवले.यापूर्वी वारणा नदीतून पाणी योजनेचे नियोजन केले होते. पण येथील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे ती योजना बंद करून कागल तालुक्यातील सुळकुड येथील दूधगंगा नदीची योजना मंजूर करण्यात आली. पण या योजनेमुळे दूधगंगा नदीकडच्या नागरिकांना पाणी कमी पडणार आहे. यामुळे ही योजना रद्द करावी यासाठी आज शिरोळ तालुक्यातील दूधगंगा नदीकाठी असणाऱ्या दत्तवाड, जुने दानवाड, नवे दानवाड, घोसरवाड, टाकळीवाडी या गावातील नागरिकांनी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळून शासनाचा निषेध केला. दूधगंगा कृती समितीने ही योजना रद्द करावी अशी मागणी केली आहे. यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, राजगुंड पाटील, बाळासो कोकणे यांच्यासह कृती समितीचे सर्व सदस्य शेतकरी उपस्थित होते.