चंदगड : गायरान आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत दुंडगे ग्रामस्थांनी सौरऊर्जा प्रकल्पाविरोधात गुरुवारी संताप व्यक्त केला. आम्ही पूरबाधित असून, आम्हाला याच जमिनीचा मोठा आधार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत होणारा प्रकल्प आमच्या माथी नकोच, शासनाने याचा फेरविचार करावा, अन्यथा तो हद्दपार करण्यासाठी यापेक्षा तीव्र लढा उभारू, असा इशाराही ग्रामस्थांनी गुरुवारी दिला.रखरखत्या उन्हातही शेकडो आंदोलक जनावरांसह सकाळी दहा वाजल्यापासून गायरान जमिनीत ठाण मांडून होते. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक असून, ती होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.दुडंगे गावाजवळ असलेल्या ८० एकर गायरान जमिनीतील ४० एकर जमिनीवर मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प होत आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून प्रकल्पासाठी जमीनही संबंधित विभागाला दिली असून, कामही सुरू आहे. गुरुवारी ग्रामस्थांनी आपल्या जनावरांसह गायरान जमिनीत आंदोलन करत प्रकल्पाला विरोध केला. प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊनही ते आंदोलनस्थळी फिरकले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक बनले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पाटील म्हणाले, दुंडगे गाव गायरान जमिनीवरच अवलंबून आहे. त्यामुळे हा सौर प्रकल्प इतरत्र घ्यावा, अन्यथा प्रकल्पातील पॅनेलवर पहिला दगड मी मारणार.यावेळी सरपंच चंद्रकांत सनदी, माजी सरपंच राजू पाटील, उपसरपंच लक्ष्मण पाटील, पुंडलिक सुतार, संजय खन्नूकर, राजेंद्र पाटील, उत्कर्ष देसाई, नामदेव कोकितकर, संदीप पाटील, शिवानंद पाटील, मारुती कोकितकर, वनिता पाटील, यमुना पाटील, अंजना सुतार यासह ग्रामस्थ उपस्थित होते.न्याय देण्याचा प्रयत्न करु - राजेश पाटीलजनभावनेचा आदर करून शांततेने तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.निर्णय रद्दसाठी पाठपुरावा करु - सतेज पाटीलदुडंगे येथील गायरान जमीन सौर ऊर्जा प्रकल्पासाठी देण्याचा झालेला निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.